नगरपालिका निवडणुकीसाठी पोलीस पेट्रोलिंग, रूट मार्च व वाहतूक तपासणी

रत्नागिरी : नगरपालिका निवडणूक २०२५ साठी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना दृढ करणे या उद्देशाने रत्नागिरी पोलीस दलातर्फे शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल (१४ नोव्हेंबर) ४.३० ते ७.३० यावेळेत रूट मार्च घेण्यात आला.

हा रूट मार्च प्रभाग क्र. ६ व ७, नाचणे पॉवर हाऊस येथून सोमेश्वर किराणा स्टोअर विश्व नगर करलेकर वाडी – आनंद नगर सद्गुरु बैठक मार्ग नवीन भाजी मार्केट छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मागील परिसर हिंदू कॉलनी-हिंदू कॉलनी प्रवेशद्वार, माळ नाका असा करण्यात आला. यामध्ये एक पोलीस अधिकारी, आठ पोलीस अंमलदार, एक आरसीपी पथक व तीस पोलीस जवान सहभागी झाले होते.

तसेच १४ नोव्हेंबर रोजी रात्री १० ते ११ यावेळेत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व नाकाबंदी ठिकाणी वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली. या वाहन तपासणी दरम्यान एकूण ३० चारचाकी व १८ दुचाकी वाहने तपासण्यात आली. ८ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करून एकूण सात हजारांचा दंड आकारण्यात आला. दोन बुलेट मोटारसायकल वाहने ही वाहन चालकांनी बदल केलेले सायलेन्सर आढळून आल्याने त्यांच्यावर मोटर वाहन कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.




