राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आलोय : आमदार अनिकेत तटकरे

आबलोली (संदेश कदम) : “जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायतीच्या निवडणुका या राष्ट्रवादी पक्ष हा या ठिकाणी स्वतंत्रपणे लढला; पण राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये महायुतीचे सरकार सामील असताना निश्चितपणे संघटना वाढीच्या दृष्टीने प्रत्येकाला तो अधिकार आहे. आमचा हेतू हाच आहे आणि म्हणूनच गुहागरमध्ये राष्ट्रवादी पक्षाला नवचैतन आणण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मी गुहागरमध्ये आलो आहे,” अशी प्रतिक्रिया आमदार अनिकेत तटकरे यांनी येथे दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, “गुहागरमध्ये जी काही विकास कामे खासदारांकडून अपेक्षित आहेत, आमदार म्हणून माझ्याकडून अपेक्षित आहेत, सरकारकडून अपेक्षित आहेत ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न राहणार आहे आणि संघटना वाढीच्या दृष्टीने सुद्धा जे काही शक्य असेल ते करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.”
बेरोजगारीविषयी बोलताना आमदार तटकरे यांनी गुहागर तालुक्याला पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराची मोठी संधी असल्याचे सांगितले. निसर्गाने आपल्या कोकणाला भरभरून दिलेले असल्याने आपल्या भागातील होतकरू तरुण तसेच भगिनींना आर्थिक सक्षम करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाच्या ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत. केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजना चालू आहेत त्याच्या माध्यमातून आपण त्यांना आर्थिक सक्षम करू शकतो. निश्चितच या भागातील तरुणांना रोजगार आणि या भागातील आर्थिक सक्षमता व्यवस्थित आणू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महायुतीच्या माध्यमातून जेव्हा विधानसभा लढवली गेली तेव्हा सुद्धा सुनील तटकरे गुहागरला दिसले नाहीत, त्यांची गुहागर तालुक्यासाठी नाराजी असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी यात तथ्य नसल्याचे सांगितले. आजही बैठकीसाठी सुनील तटकरे यांनी स्वतःहून वेळ दिली होती. विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्याने कालच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांना त्या ठिकाणी प्रदेशाअध्यक्ष म्हणून प्राचारण केले. पक्षाचे प्रमुख नेते असल्यामुळे देशाची, राज्याची त्यांच्यावर अधिकची जबाबदारी आहे. त्यामुळे स्वभाविक ते इथे येऊ शकले नाहीत, मात्र पुढच्या कालखंडामध्ये सुनील तटकरे नक्की येतील, असे त्यांनी सांगितले.
दुष्काळावर बोलताना आमदार अनिकेत तटकरे म्हणाले की, “पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील एकही तालुका दुष्काळग्रस्त नाही रायगड जिल्ह्यात एकच श्रीवर्धन तालुका जाहीर झाला आह. रत्नागिरीमध्ये तीन तालुके जाहीर झाले आहेत, तर सिंधुदुर्गमध्य एक तालुका जाहीर झाला आहे. इतर भागात, विभागात असलेली परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे कोकणातील सर्व तालुक्यांना सुद्धा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावे, अशी कोकणातील सर्व लोकप्रतिनिधींची राज्य सरकारकडे आग्रही मागणी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यूपीएससीच्या परीक्षेबाबत विचारले असता आमदार तटकरे यांनी याविषयावर बोलायला माझ्यासारखा कार्यकर्ता फार लहान आहे. या बाबतीत राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल ते योग्यपणे दखल घेतील मुख्यमंत्री महोदय सक्षम आहेत. तसेच गृहमंत्री अमित शाह त्या ठिकाणी चांगलं काम करत आहेत. सरकार त्या बाबतीत योग्य दखल घेईल, असे त्यांनी सांगितले.



