दापोलीत जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

दापोली : रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढीच्या वतीने तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेसाठी इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना विविध सामाजिक विषय या देण्यात आले होते. नुकत्याच झालेल्या या वक्तृत्व स्पर्धेला पतसंस्थेचे उपाध्यक्ष, ज्ञानदीप माध्यमिक विद्यामंदिरचे ज्येष्ठ शिक्षक किशोर नागरगोजे, दापोली शाखा संचालक बिपीन मोहिते उपस्थित होते.

या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सातवी गटात संतोष भाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूलच्या काव्या शेरे, मराठा मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या गार्गी तुरे, साने गुरुजी विद्यामंदिर पालगडच्या अन्वय प्रसाद पावसे यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. गवताळ हायस्कूलच्या प्रांजल घडवले हिने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले.
इयत्ता आठवी ते दहावीच्या गटात दाभोळ येथील लोकमान्य टिळक हायस्कूलच्या धनश्री करोडे ही प्रथम, पंचनदी हायस्कूलची संगिनी येलवे द्वितीय, तर ज्ञानदीप विद्यामंदिरची सृष्टी ढवळे आणि बहुजन हिताय विद्यामंदिर आगरवायंगणी येथील वैभवी महाडिक यांनी तृतीय क्रमांक पटकावला. संतोष भाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूलच्या जान्हवी देवघरे हिने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले.
इयत्ता अकरावी ते बारावीच्या गटात चिखलगाव येथील लोकमान्य टिळक विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजच्या श्रावणी धस हिने प्रथम, वराडकर-बेलोसे महाविद्यालयाच्या सलोनी शिगवण हिने द्वितीय क्रमांक मिळवला.
या स्पर्धेला परीक्षक म्हणून दापोली अर्बन सीनियर सायन्स कॉलेजचे प्रा. संतोष मराठे, वराडकर-बेलोसे महाविद्यालयाचे शिक्षक श्री. गडकर, गोपाळकृष्ण सोहनी विद्यामंदिर शिक्षक श्री. गमरे, शिक्षक श्री. जोशी यांनी काम पाहिले.
या वक्तृत्व स्पर्धेला दापोली तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेसाठी क्रीडा शिक्षक सत्यवान दळवी यांनी सूत्रसंचालन केले.



