जानवळे मुस्लिम मोहल्ला येथे इफ्तारसाठी सर्वधर्मीय बांधव एकत्र

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील जानवळे मुस्लिम मोहल्ला यांच्या वतीने पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून इफ्तार पार्टीचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जानवळे मोहल्ल्यासह शृंगारतळी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शृंगारतळी जिल्हा परिषद गटाचे नूतन सदस्य व मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, शृंगारतळी पंचायत समिती गणाचे सदस्य गौरव वेल्हाळ, जानवळे गावच्या सरपंच जान्हवी विखारे, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्यासह जानवळे तंटामुक्ती अध्यक्ष रमेश नार्वेकर, पोलीस पाटील संतोष जानवळकर, ग्रामपंचायत अधिकारी सोनवणे, पाटपन्हाळे ग्रामपंचायत सदस्य शब्बीर शेख, माजी सरपंच संजय पवार व जानवळे गावातील अनेक मान्यवर मंडळी याप्रसंगी उपस्थित होती.
यावेळी सामूहिक दुवा पठण करण्यात आले आणि मगरीबची आझान झाल्यावर सर्वांनी एकत्रितपणे रोजा सोडला. रोजा सोडल्यानंतर मोहल्ल्यातील युवकांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत केले.
याप्रसंगी बोलताना प्रमोद गांधी यांनी सांगितले की, “समाजात सर्वधर्मीय एकोप्याचे वातावरण निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे. अशा इफ्तार पार्टीसारख्या कार्यक्रमांमधून समाजात ऐक्य, बंधुभाव आणि परस्पर सन्मान अधिक दृढ होतो, त्यामुळे असे उपक्रम सातत्याने आयोजित व्हावेत.”
त्यांनी यावेळी सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या. जानवळे मुस्लिम मोहल्ल्यातील युवकांनी या कार्यक्रमाचे केलेले नेटके नियोजन संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरले असून, यातून सामाजिक सलोख्याचे दर्शन घडले आहे.



