मुख्य बातमी

राष्ट्राच्या इतिहास, संस्कृतीचा अभिमान बाळगा : शिल्पा पटवर्धन

इतिहास शोध आणि बोध मंडळातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा

रत्नागिरी : भारतावर ब्रिटिशांनी दीडशे वर्षे राज्य केले. फोडा आणि झोडा या नीतीने राज्य केले. आजही परकीय शक्ती वाकड्या नजरेने पाहत असेल तर आपण देशाचा नागरिक म्हणून प्रतिकार करणे, एक आहोत हे दाखवून देणे हे आपले कर्तव्य आहे. भांडत राहिलो तर पुन्हा आक्रमण होऊ शकते, हे इतिहासातून शिकले पाहिजे. आपल्या राष्ट्राचा, संस्कृतीचा अभ्यास करा व अभिमान बाळगा, असे प्रतिपादन शनिवारी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन यांनी केले.

गोगटे-जोगळेकर महाविद्यालय व अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या इतिहास शोध आणि बोध अभियान मंडळातर्फे अतुल्य भारत प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यवाह सतीश शेवडे, अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, कला विभागप्रमुख वैभव कानिटकर, विज्ञान विभागप्रमुख दिलीपकुमार शिंगाडे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख डॉ. पंकज घाटे, इतिहास शोध आणि बोध अभियान मंडळ समन्वयक प्रा. निनाद तेंडुलकर उपस्थित होते.

प्राचीन संस्कृती भारताला लाभली आहे. पुढच्या वेळेस एकाच विषयावर म्हणजे रामायण, महाभारत, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करावे. यामुळे विद्यार्थ्यांचा संस्कृतीचा चांगला अभ्यास होईल, एकसंध भारताचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी बालदोस्तांसह नागरिकांनी योगदान द्यावे, असे विचार सतीश शेवडे यांनी व्यक्त केले. या वेळी शिर्के प्रशालेच्या अत्रेय देवस्थळी आणि शिक्षक आयरे यांनी प्रातिनिधीक मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी डॉ. घाटे यांनी अतुलनीय भारताचे वैभव विद्यार्थ्यांना समजावा. इतिहासाची आवड निर्माण व्हावी, ऐतिहासिक वारशाची ओळख व्हावी व पुढच्या पिढ्यांपर्यंत जावा, या हेतूने अतुल्य भारत प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केल्याचे सांगितले.

इतिहास शोध आणि बोध मंडळातील शिक्षक दत्तात्रय माळवदे, दिलीप जाधव, अन्वी कोळंबेकर, अपर्णा तगारे, आदेश मुकणे, योगेश जाधव, मधुरा चव्हाण, संयुक्ता शेट्ये आणि विद्यार्थी स्वयंसेवकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेहनत घेतली. सूत्रसंचालन जान्हवी जोशी हिने केले. प्रा. तेंडुलकर यांनी आभार मानले.

स्पर्धेचा निकाल

प्रथम क्रमांक- रा. भा. शिर्के प्रशाला- अत्रेय देवस्थळी, श्रेया वाडकर, चैतन्य मुळ्ये, मार्गदर्शक- राजेश आयरे. द्वितीय विभागून- नवनिर्माण हाय- प्रसेनजित कांबळे, जयराज चौरी, भार्गवी पवार, मार्गदर्शक- सौ. अलमास लांबे आणि जीजीपीएस- आभा भाटवडेकर, आयुष ठाकूर, राधा खानोलकर, मार्गदर्शक सोनिया कांबळे, तृतीय- फाटक हायस्कूल- रुद्र घडशी, तपस्या बोरकर, सिद्धी मोडक, मार्गदर्शक शिक्षक सौ. श्रेया रानभरे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!