शास्त्रीय गायन स्पर्धेत अर्णव सरपोतदार, तन्वी मोरे प्रथम
स्वराभिषेकचे आयोजन; गंधर्वरत्न आनंद प्रभुदेसाई स्मृतिप्रीत्यर्थ स्पर्धा

रत्नागिरी : येथील स्वराभिषेक संस्थेतर्फे गंधर्वरत्न आनंद प्रभुदेसाई स्मृतिप्रीत्यर्थ यावर्षी शास्त्रीय गायन स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये पहिल्या गटात अर्णव सरपोतदार, तर दुसऱ्या गटात तन्वी मोरे हिने प्रथम क्रमांक पटकावला.
आनंद प्रभुदेसाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्वराभिषेकतर्फे गेली आठ वर्षे विविध गीतप्रकारांच्या स्पर्धा घेतल्या जातात. यामध्ये अभंग गायन, नाट्यगीत, नाटकातले अभंग अशा स्पर्धा पार पडल्या आहेत. यावर्षी शास्त्रीय गायन स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. यामध्ये पहिल्या गटाला छोटा ख्याल आणि दुसऱ्या गटाला बडा व छोटा ख्याल गायन स्पर्धा पार पडली. दोन्ही स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
स्पर्धेचा निकाल असा : पहिला गट : प्रथम- अर्णव आशिष सरपोतदार, द्वितीय- आदित्य महेश दामले, तृतीय- स्वरा अमित भागवत, उत्तेजनार्थ- द्वितीया पवार व शंतनू पावसकर, दुसरा गट : प्रथम- तन्वी मंगेश मोरे, द्वितीय- अनामय सतीश बापट, तृतीय- गौतमी वाडकर, उत्तेजनार्थ- ऐश्वर्या सावंत व आदित्य लिमये. स्पर्धेचे परीक्षण गोवा येथील प्रसिद्ध गायक सचिन तेली आणि ज्येष्ठ तबलावादक अमित भोसले यांनी केले, तर साथसंगत केदार लिंगायत, पुष्कर सरपोतदार (तबलासाथ), मंगेश मोरे, महेश दामले (संवादिनीसाथ) यांनी केली. एस कुमार साऊंडचे उदयराज सावंत यांनी ध्वनिसंयोजन केले. स्पर्धेनंतर परीक्षक श्री. तेली आणि भोसले यांनी स्पर्धकांना शास्त्रीय संगीतातील सादरीकरणाबद्दल बहुमोल मार्गदर्शन केले. विजेत्यांना परीक्षक तसेच स्वराभिषेकच्या संचालिका सौ. विनया परब, गगनगिरी महाराज आश्रमाचे व्यवस्थापक राम पानगले यांच्या हस्ते विजेत्यांना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आली.



