रत्नागिरीत संविधानावर विचारमंथन
जागर विचारमंचाच्या वतीने ७ डिसेंबर रोजी राष्ट्रीय संविधान परिषदेचे आयोजन

रत्नागिरी : भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवानिमित्त रत्नागिरीत ७ डिसेंबर रोजी राष्ट्रीय संविधान परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात ही परिषद होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
देशाच्या संविधानिक आणि लोकशाही मूल्यांच्या प्रचार-प्रसारासाठी कार्यरत असलेल्या संविधान जागर विचारमंच, महाराष्ट्रच्या वतीने संविधानाच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने ७ डिसेंबर रोजी एकदिवसीय राष्ट्रीय संविधान परिषदेचे आयोजन केले आहे. ही परिषद केवळ एक औपचारिक कार्यक्रम नसून, याद्वारे संविधानातील मूल्ये, तत्त्वे आणि आदर्श यांचा जागर करून त्यांना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश आहे.
परिषदेची सुरुवात सकाळी ८.३० ते १० या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जिल्हा शासकीय रुग्णालय ते स्वा. सावरकर नाट्यगृह या दरम्यान काढण्यात येणाऱ्या संविधान दिंडीने होणार आहे. परिषदेचे उद्घाटन सकाळी १०.३० वाजता प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, माजी खासदार व संविधान अभ्यासक डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते होणार असून, मुंबई उच्च न्मायालयातील माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे या समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या प्रसंगी डॉ. जाधव ‘मी भारतीय नागरिक आणि संविधान या, तर न्या. ठिपसे ‘भारतीय संविधानातील उद्धृत सामाजिक न्साय’ या विषयावर आपले विचार मांडणार आहेत.
या समारंभात संविधानिक मूल्यांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी योगदान देणाऱ्या प्रा. डॉ. गुलाबराव राजे यांना पहिला ‘राष्ट्रीय संविधान सन्मान पुरस्कार २०२५’ देऊन गौरविण्यात येणार आहे. दोन सत्रांत होणाऱ्या या परिषदेत सामाजिक कार्यकर्त्या प्रा. सुनीता गायकवाड प्रसिद्ध कवी ‘दंगलकार’ नितीन चंदनशिवे तसेच सायंकाळी ४ वाजता होणाऱ्या समारोप समारंभात वरिष्ठ पत्रकार आणि विचारवंत, वक्ते श्री. संजय आवटे हे संविधानविषयक विविध पैलूंवर मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचार आणि आदर्शावर आधारित संभाजी भगत संकल्पित व राजकुमार तांगडे लिखित ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या प्रसिद्ध सामाजिक नाटकाच्या प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे.
या परिषदेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन परिषदेचे समन्वयक प्रा. दत्तात्रय कांबळे आणि परिषदेचे आयोजक प्रा. डॉ. शाहू मधाळ, किरण धांडोरे, प्रा. डॉ. रामा सरतापे यांनी केले आहे. ही परिषद सर्व वयोगटातील नागरिकांसाठी खुली आहे.



