‘एनएमएमएस’ परीक्षेत पटवर्धन हायस्कूलचे घवघवीत यश

रत्नागिरी : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील शैक्षणिक योजनेमधील शिष्यवृत्ती परीक्षेचा (एनएमएमएस) निकाल नुकताच जाहीर झाला असून, यात शहरातील पटवर्धन हायस्कूलमधील १० विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. इयत्ता आठवीमधील सहा विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळाले आहे. या मुलांना प्रतिवर्षी १२ हजार असे ४ वर्षे म्हणजे प्रति विद्यार्थी ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच ४ विद्यार्थ्यांना सारथी शिष्यवृत्ती मिळाली आहे. या मुलांना प्रति वर्षी ९ हजार ६०० असे ४ वर्षे म्हणजे प्रति विद्यार्थी ३८ हजार ४०० रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.
या परीक्षेसाठी बसलेल्या मुलांना शाळेतील शिक्षक श्री. दिवटे, श्री. पालकर, श्री. वावरे, श्रीमती दामले, श्री. वैद्य, श्रीमती पिलणकर यांनी मार्गदर्शन केले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. घाटविलकर, उप मुख्याध्यापक श्री. पंगेरकर , पर्यवेक्षक श्री. लवंदे, पर्यवेक्षिका श्रीमती शिरोळकर, श्रीमती नाईक यांनी केलेल्या अनमोल मार्गदर्शनामुळे हे विद्यार्थी शिष्यवृत्ती प्राप्त करू शकले. श्री. गवाणकर व श्रीमती देवरुखर यांनी विद्यार्थ्यांचे परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी अतिशय महत्त्वाची मदत केली.
शिष्यवृत्ती प्राप्त केलेले विद्यार्थी असे : शेडेकर श्रावणी तेजस (जिल्ह्यामधून खुल्या गटातून १४ वा क्रमांक), अल्लोळकर सानिका रुक्मान्ना (जिल्ह्यामधून खुल्या गटातून ३४ वा क्रमांक), पानवलकर अर्णव अंकुश (जिल्ह्यामधून खुल्या गटातून ४९वा क्रमांक), सूर्यवंशी मैत्री महेश (जिल्ह्यामधून खुल्या गटातून ५७ वा क्रमांक), तोडणकर हर्षा दिवाकर (जिल्ह्यामधून खुल्या गटातून ६२ वा क्रमांक), गोरीवले तीर्था शशिकांत (जिल्ह्यामधून ओबीसी गटातून ३१वा क्रमांक).
सारथी शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थी असे : देसाई तन्मय संतोष, सुर्वे श्रेयसी देवेश, जाधव अरुंधती इंद्रनील आणि सावंत पुष्पराज संजय.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या उत्तुंग यशाबद्दल भारत शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, पटवर्धन हायस्कूलचे पालक शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी, पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका,पर्यवेक्षक या सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.



