मुख्य बातमी

६१ लाखांची फसवणूक; गुजरात येथून एकजण ताब्यात 

रत्नागिरी पोलिसांची कामगिरी

रत्नागिरी : बँकेत २ कोटींचा लॉन्ड्रीग व्यवहार झाल्याची बतावणी करत ६१ लाखांना चुना लावणाऱ्याच्या मुसक्या रत्नागिरी पोलिसांनी गुजरात येथून आवळल्या. नेपाल निताई चरण जना (रा. रुम नं. २०५, हरीदासन रेसिडन्सी, मेघा प्लाझा, ता. पालसाना, जि. सुरत, राज्य गुजरात, मुळ रहाणार पूर्ण मेतनीपूर, मोयना प. बंगाल) असे त्याचे नाव असून, त्याच्याविरुद्ध रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

नेपाल निताई चरण जना याने फिर्यादी यांना मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन विभागातून बोलत असल्याची बतावणी करून त्यांचे सीमकार्ड बंद होणार असल्याची भीती घातली. तसेच पोलिसांकडे तक्रारीसाठी कॉल फॉरवर्ड करीत असल्याचा बहाणा केला. त्याचवेळी अन्य एका व्यक्तीने पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करत फिर्यादीचे कॅनरा बँकेत खाते उघडण्यात आले असून त्या खात्यामधून २ कोटी रुपयांचा मनी लॉन्ड्रीग व्यवहार झाल्याची भीती घातली आणि फिर्यादीना त्या बँक खात्यामध्ये रक्कम भरण्यास भाग पाडून त्यांची ६१ लाख १९ हजार ८० रुपयांची फसवणूक केली.

फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यात याबाबत भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४), ३१९(२) ३(५), माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (सी), ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याच्या तपासकामी फसवणुकीच्या आर्थिक व्यवहारांबाबत बँकांकडून प्राप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी नेपाल निताई चरण जना (रा. रुम नं. २०५, हरीदासन रेसिडन्सी, मेघा प्लाझा, ता. पालसाना, जि. सुरत, राज्य गुजरात, मुळ रहाणार पूर्ण मेतनीपूर, मोयना प. बंगाल) हा निष्पन्न झाला.

रत्नागिरी पोलिसांचे पथक गुजरात येथे तपास पथक पाठवून या आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, न्यायालया समोर हजर केले असता त्यास ३ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

गुन्ह्याचा तपास व आरोपीस अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणे कडील प्रभारी अधिकारी पोनि श्रीमती स्मिता सुतार, पोहवा संदीप नाईक, पोहवा अमोल गमरे, पोहवा विक्रम पाटील, पोकों निलेश शेलार यांनी कामगिरी बजावली.

“कोणीही मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन/ नॅशनल सिक्युरिटी विभाग/इतर विभागातून बोलत आहोत असे सांगून तुमचे सिमकार्डचा गैरवापर झाला असून त्याकरीता तुमची चौकशी करावयाची असल्याचे सांगून तुमची वैयक्तिक व बँकांची आर्थिक माहिती मागत असेल. तसेच अकाऊंट व्हेरीफिकेशन करीता पैसे ट्रान्सफर करा असे सांगत असेल, तर अशा कॉलवर विश्वास ठेवू नका. आपली वैयक्तिक/बैंक खात्यांची माहिती कोणालाही देवू नका व अशा धमक्यांना बळी पडू नका,” असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!