रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका चिपळूणतर्फे एसटी महामंडळाच्या चिपळूण आगार व्यवस्थापकांना निवेदन

चिपळूण (संदेश कदम) : खांदाट-गवळवाडी येथे २९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसचा अपघात झाला. या अपघातामध्ये अनेक प्रवासी जखमी झाल्याची घटना अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे. एसटी महामंडळ हे सर्वसामान्य जनतेच्या प्रवासाची जीवनवाहिनी असून प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी महामंडळाची आहे. भविष्यात अशा प्रकारच्या अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी संबंधित अपघाताची निष्पक्ष व सखोल चौकशी करून आवश्यक ती तातडीची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका चिपळूण यांच्या वतीने एसटी महामंडळाच्या चिपळूण आगार व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे : या अपघाताची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. अपघातास जबाबदार असलेल्या दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. अपघातातील जखमी प्रवाशांना योग्य ती आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्यात यावी तसेच जखमींना मोफत व दर्जेदार वैद्यकीय उपचाराची व्यवस्था करण्यात यावी. एसटी बसची नियमित तांत्रिक तपासणी व देखभाल काटेकोरपणे करण्यात यावी. चालक व वाहक यांच्या कामाच्या वेळा, पुरेशी विश्रांती तसेच त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी करण्यात यावी. भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुरक्षा उपाययोजना तातडीने राबवून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.
या सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करून संबंधित अपघाताबाबत तातडीने योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा सर्वसामान्य जनता व प्रवाशांच्या हितासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका चिपळूण यांच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका चिपळूण चे तालुकाध्यक्ष प्रशांत मोहिते, सरचिटणीस तथा भिले गावचे उपसरपंच उमेश सकपाळ, शहराध्यक्ष मंगेश जाधव, सरचिटणीस अमोल कदम, शहर कार्यकारिणी सदस्य विलास जाधव, कापरे विभाग अध्यक्ष राजारामजी साळवी आदी मान्यवर उपस्थित होते.



