Uncategorized

‘साहित्यप्रेमी’चे ओरोसला २६ रोजी ‘आषाढसरी” कविसंमेलन; अध्यक्षपदी कवी अजय कांडर

सिंधुदुर्गनगरी : ‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या जूनच्या मासिक कार्यक्रमानिमित्त गुरुवारी (२६ जून) सायंकाळी ५ वाजता आषाढ मासारंभ आणि महाकवी कालिदास दिनाचे औचित्य साधून ‘आषाढसरी’ कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कवी, ‘आवानओल प्रतिष्ठान’चे अध्यक्ष अजय कांडर उपस्थित राहणार आहेत. ओरोस, जैतापकर कॉलनी येथील दत्तराज सहकारी सोसायटीच्या सभागृहात हा कार्यक्रम होईल.

‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ या साहित्यिक व्यासपीठाचा हा पाचवा मासिक कार्यक्रम आहे. २६ जून रोजी आषाढ महिन्याचा पहिला दिवस म्हणजे आषाढ शुद्ध प्रतिपदा आहे. हा दिवस कविकुलगुरु कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ ही पंक्ती कालिदासांच्या ‘मेघदूत’ या महान काव्याचा सुरुवातीचा श्लोक आहे. पावसाळा सुरु झाला आहे. सृजनाचा संदेश घेऊन येणारा हा पाऊस कवींचाही आवडता ऋतू आहे. म्हणूनच ‘आषाढसरी’ हा कविसंमेलनाचा कार्यक्रम आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी कविकुलगुरु कालिदास दिनाचे औचित्य साधुन होत आहे. हा कार्यक्रम सर्वांना खुला आहे.

इच्छुकांनी प्रत्येकी एक कविता सादर करायची आहे. पावसाळा असल्याने शक्यतो कविता पावसावर आधारित असल्यास चांगले. मात्र तशी अट नाही. कविता गद्य परिच्छेदात्मक असणार नाही, याची काळजी घ्यावी. आपली कविता म्हणून झाल्यावर निघून जाता येणार नाही. अलीकडे आपण पावसात भिजत नाही. पण कवितांच्या पावसात भिजण्यासाठी हा कार्यक्रम अजिबात चुकवू नका. इच्छुक कवींनी ९४२२४१३८०० या वॉटसॲपवर नावनोंदणी करावी. कवी व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व कार्यक्रम वेळेवर सुरू व्हावा, यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन समन्वयक सतीश लळीत व डॉ. सई लळीत यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!