मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण सत्राचे आयोजन
युवकांनी २९ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित करण्यात येणारे सहा महिन्यांचे सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण १ जानेवारी २०२६ पासून मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, रत्नागिरी येथे सुरू होत आहे. या प्रशिक्षणसाठी २९ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी जी. द. सावंत यांनी केले आहे.
प्रशिक्षणासाठी उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्ष, उमेदवार किमान चौथी पास, क्रियाशिल मच्छिमार व किमान एक वर्ष मासेमारीचा अनुभव आवश्यक असणार आहे. प्रशिक्षणाचे शुल्क प्रतिमाह ४५० रुपये प्रमाणे सहा महिन्यांचे २ हजार ७०० रुपये व दारिद्र्यरेषेखालील उमेदवारांसाठी प्रतिमाह १०० रुपये प्रमाणे सहा महिन्यांचे ६०० रुपये आहे. आधारकार्ड, रेशनकार्ड व शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायाप्रत, दारिद्रयरेषेखालील असल्यास ग्रामसेवक/गटविकास अधिकारी यांचा दाखला जोडणे आवश्यक आहे.
प्रशिक्षणानंतर राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) अंतर्गत योजनेतून अर्थसहाय्य घेवून मच्छिमारी नौका बांधता येतील तसेच सागरी नौकांवर पात्रतेनुसार खलाशी म्हणून रोजगाराच्या संधी उपलब्ध होवू शकतात. अर्ज स्वत:चे हस्ताक्षरात भरून त्यावर मच्छिमार संस्थेची शिफारस घेवून अर्ज सादर करावेत. इच्छुक युवकांनी प्रशिक्षण केंद्राशी किंवा मोबाईल व व्हॉटस्अप क्रमांक 9422371901 अथवा ई-मेल आयडी ftcrtn@gmail.com वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



