रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या ज्येष्ठ नागरिक दिनाच्या कार्यक्रमातील नियोजनात बदल

रत्नागिरी : शहर ज्येष्ठ नागरिक संघ दरवर्षी १ ऑक्टोबरला ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करतो. त्या दिवसाचे औचित्य साधून संघाच्या सभासदांचा सत्कार करतो. त्याप्रमाणे सर्व संबंधित ज्येष्ठ सभासदांना निमंत्रण पाठवले आहे. तथापि २५ सप्टेंबरला हवामान विभागाने वर्तवलेला २६ ते ३० सप्टेंबरपर्यंतचा अतिवृष्टीचा अंदाज आणि त्या संदर्भात जिल्हा प्रशासनाने दिलेल्या दक्षतेचा इशारा विचारात घेता १ ऑक्टोबरच्या कार्यक्रमाला ज्येष्ठ आणि ज्येष्ठतम सभासदांच्या उपस्थिती बाबत आम्ही साशंक आहोत.
हवामानातील अनपेक्षित बदलाचा साकल्याने विचार करून बुधवार दि. १ ऑक्टोबरचा नियोजित कार्यक्रम स्थगित करून हाच कार्यक्रम रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिनी म्हणजेच १३ ऑक्टोबरला संघाच्या शिवाजी नगर येथील सभागृहात सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात येत आहे.
सर्व संबंधिताना दुरध्वनी /पत्राद्वारे कळविण्यात येत आहे. संघाच्या सर्व सभासदांनी कार्यक्रमाच्या तारखेतील बदलाची कृपया नोंद घेऊन संघाला सहकार्य करावे, असे आवाहन संघाच्या कार्यकारिणीच्या वतीने संघांचे अध्यक्ष सुभाष थरवळ यांनी केले आहे.



