मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

गुहागरमधील खराब रस्त्याचा मार्ग मोकळा; २४ मेपर्यंत काम सुरू होणार

अधिकाऱ्यांचा लोकशाही दिनात सहभाग : नागरिकांच्या पाठपुराव्याला यश

आबलोली (संदेश कदम) : गुहागर ते शासकीय विश्रामगृह तिसरे वाकणपर्यंतच्या खराब रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागली असून, गुहागरप्रेमी नागरिकांच्या वतीने करण्यात पाठपुराव्याला यश आले आहे. येत्या २४ मे पर्यंत रस्त्याचे काम सुरू केले जाईल, असे ठोस आश्वासन गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाचे सक्षम अधिकारी शाम खुचेकर यांनी गुहागर येथे आयोजित लोकशाही दिनात दिले.

गुहागर ते शासकीय विश्रामगृह तिसरे वाकणपर्यंतचा रस्ता खराब झाला असून, याबाबत गुहागरप्रेमी नागरिकांच्या वतीने गेले दोन महिने स्थानिक प्रशासनाकडे तसेच गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग कार्यालय, चिपळूण येथे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. याबाबत निवेदनही देण्यात आले होते. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे नागरिक आक्रमक झाले होते आणि त्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता.

या प्रकरणी गुहागर तहसीलदार यांनी मोलाचे मार्गदर्शन करीत आजच्या लोकशाही दिनात महामार्गचे सक्षम अधिकारी यांना बोलावून घेतले. आजच्या लोकशाही दिनात याबाबत चर्चा झाली. सक्षम अधिकारी शाम खुचेकर यांनी येत्या २४ मे २०१५ च्या आत या खराब रस्त्याचे काम सुरू केले जाईल, असे ठोस आश्वासन नागरिकांना दिले. गेले दोन महिने सातत्याने पाठपुरावा केलेल्या या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने गुहागर प्रेमी नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

आज झालेल्या या लोकशाही दिनाला पदाधिकारी अनिल शिंदे, विशवनाथ रहाटे, अरुण भुवड, विनोद जानवळकर, नामदेव अवेरे, पराग कांबळे, अभिजित रायकर आदी उपस्थित होते. दरम्यान या प्रश्नी बाबत प्रशासनाने चांगले सहकार्य केल्याबद्दल पराग कांबळे यांनी जाहीर आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!