क्रीडामहाराष्ट्रमुख्य बातमी

सोलापूर, धाराशिव, पुणे आणि मुंबई उपनगरची उपांत्य फेरीत धडक

मुलींच्या गटात सांगली, सोलापूर, धाराशिव व ठाणेची आगेकूच

सोलापूर (स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडा नगरीतून) : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने, सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशन व किरण स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने नेहरूनगर येथील शासकीय मैदानावर सुरू असलेल्या ५२व्या कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतील सामने प्रचंड रंगतदार झाले. कुमार गटात धाराशिव, पुणे, मुंबई उपनगर आणि सोलापूर, तर मुलींच्या गटात सांगली, सोलापूर, धाराशिव आणि ठाणे यांनी दमदार विजयांसह उपांत्य फेरीत धडाकेबाज प्रवेश केला.

कुमार गटातील सर्वाधिक चुरशीच्या सामन्यात सोलापूरने ठाण्याचा ४२-४० असा २ गुणांनी निसटता पराभव केला. मध्यंतरास दोन्ही संघ २०-२० अशा बरोबरीत होते. मात्र मध्यंतरापूर्वी आणि अंतिम डावात मिळालेल्या प्रत्येकी एका ड्रीम रनमुळे सोलापूरच्या विजयाचा पाया रचला गेला. सोलापूरकडून अकबर शेख (८ गुण), रोहन मोरे (१.२० मि. संरक्षण व ६ गुण), सिद्धार्थ माने देशमुख (१ मि. संरक्षण व ६ गुण) आणि अभय गवळी (१ मि. संरक्षण व ६ गुण) यांनी मोलाची कामगिरी बजावली. ठाण्याकडून विनायक भांगे (१६ गुण) आणि ओंकार सावंत (२ मि. संरक्षण व २ गुण) यांनी कडवी झुंज दिली; मात्र ती अपुरी ठरली.

दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात धाराशिवने अहिल्यानगरचा ४९-२८ असा दणदणीत पराभव करत धुव्वा उडवला. हरद्या वसावे (२.२० मि. संरक्षण व ८ गुण) आणि राज जाधव (१.३० मि. संरक्षण व १० गुण) यांच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर धाराशिवने एकहाती वर्चस्व गाजवले. पराभूत अहिल्यानगरकडून गौरव कुडले (१.१०, १.२०, मि. संरक्षण व ८ गुण) याने एकाकी झुंज दिली.

तिसऱ्या सामन्यात मुंबई उपनगरने सांगलीला ४०-३६ असे नमवत उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित केले. मध्यंतरातील २४-१६ ही आघाडी निर्णायक ठरली. समर्थ सावंत (२ मि. संरक्षण व १८ गुण) आणि अमेय मुर्चावडे (२, १.३० मि. संरक्षण) यांनी मुंबई उपनगरचा विजय साकारला. सांगलीकडून पार्थ देवकते (१.२० मि. संरक्षण व १० गुण) याची झुंज उल्लेखनीय ठरली.

चौथ्या सामन्यात पुण्याने साताऱ्याचा ४८-३६ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. पुण्याकडून आदेश पाटील (१६ गुण) आणि अद्वैत बेतने (१.०५ मि. संरक्षण व ८ गुण) यांनी अष्टपैलू खेळ केला. साताऱ्याकडून तबरेज खान (१.२० मि. संरक्षण व १२ गुण) याची चमकदार कामगिरी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.

मुलींच्या गटातील सर्वाधिक रंगतदार सामन्यात धाराशिवने पुण्याचा २७-२६ असा अवघ्या एका गुणाने पराभव करत उपांत्य फेरीत धमाकेदार प्रवेश केला. मध्यंतरास १५-११ अशी आघाडी घेतलेल्या धाराशिवने शेवटपर्यंत संयमी खेळ करत विजय खेचून आणला. मैथिली पवार (४.५०, नाबाद १.५० मि. संरक्षण व ६ गुण) आणि सिद्धी भोसले (१.४० मि. संरक्षण व ६ गुण) या विजयाच्या प्रमुख शिल्पकार ठरल्या. पुण्याकडून श्वेता नवले (२.२०, १.२० मि. संरक्षण व ६ गुण) आणि आर्या चोरमोले (६ गुण) यांनी जोरदार प्रतिकार केला.

दुसऱ्या सामन्यात सोलापूरने नाशिकचा २९-२१ असा एक डाव राखून दणदणीत पराभव केला. स्नेहा लामकाने (३.३० मि. संरक्षण व १० गुण) आणि अश्विनी मांडवे (२ मि. संरक्षण व ८ गुण) यांच्या अष्टपैलू खेळीसमोर नाशिकचा बचाव निष्प्रभ ठरला. नाशिककडून जयश्री पवार (२.१० मि. संरक्षण व ६ गुण) हिची एकाकी झुंज अपुरी पडली.

तिसऱ्या सामन्यात सांगलीने रत्नागिरीचा २९-१२ असा एक डाव राखून धुव्वा उडवला. विद्या तामखेडे (१.३० मि. संरक्षण व ६ गुण) आणि धनश्री तामखेडे (४.१० मि. संरक्षण व २ गुण) यांनी सांगलीचा विजय साकारला. रत्नागिरीकडून आर्या डोरलीकर (२.२० मि. संरक्षण व नाबाद १ मि. संरक्षण) हिने झुंज दिली.

चौथ्या सामन्यात ठाण्याने साताऱ्यावर ३३-२० अशी ५.५० मिनिटे राखून प्रभावी मात केली. धनश्री कंक (२.५० मि. संरक्षण व १२ गुण) आणि प्रणिती जगदाळे (२, नाबाद १.१० मि. संरक्षण) यांनी ठाण्याच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. साताऱ्याकडून अक्षरा सोळुंखे (१.२० मि. संरक्षण व ८ गुण) हिची कामगिरी उल्लेखनीय ठरली.

आता उपांत्य फेरीत कुमार गटात धाराशिव विरुद्ध पुणे आणि मुंबई उपनगर विरुद्ध सोलापूर, तर मुलींच्या गटात सांगली विरुद्ध सोलापूर आणि धाराशिव विरुद्ध ठाणे अशा जबरदस्त लढती रंगणार असून राज्य विजेतेपदाच्या शर्यतीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण खो-खो विश्वाचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!