मुख्य बातमी

खेळता खेळता विहिरीत पडून ३ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

रत्नागिरी : कोकणात आपल्या आई-वडिलांसह देवदर्शनासाठी आलेल्या अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर काळाने घाला घातला. तालुक्यातील जयगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भगवतीनगर, निवेंडी येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हळहळला असून जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईतील दहिसर येथील स्वरा स्वप्नेश जाधव (वय ३) ही आपल्या आई-वडिलांसह आणि नातेवाईकांसोबत पर्यटनासाठी निवेंडी येथे आली होती. ३ जून रोजी सायंकाळी ती इतर लहान मुलांसोबत अंगणात खेळत होती. मात्र अचानक काही वेळाने आई श्वेता जाधव यांचे लक्ष गेले असता स्वरा कुठेच दिसत नव्हती. लेक नजरेआड झाल्याचे लक्षात येताच आईच्या काळजाचा ठोका चुकला. कुटुंबीयांनी आणि उपस्थितांनी तिचा शोध सुरू केला.

दरम्यान, स्वराचे मामा ओंकार भोईर यांनी घराजवळील विहिरीत डोकावून पाहिले आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. चिमुकली स्वरा विहिरीच्या पाण्यात निपचित तरंगताना दिसली. ते दृश्य पाहताच परिसरात एकच आक्रोश उसळला.

स्थानिकांच्या मदतीने तातडीने स्वराला विहिरीबाहेर काढण्यात आले. तिचे प्राण वाचावेत म्हणून सीपीआर देण्यात आला. त्यानंतर तिला मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही उपचारापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली असल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. देवदर्शन आणि सहलीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या कुटुंबाच्या आयुष्यात एका क्षणात दुःखाची काळी छाया पसरली. या दुर्दैवी घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून जयगड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, चिमुरडी स्वराच्या निधनाने संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!