जिल्हा अधीक्षकांची “लक्ष्मी ऑर्गेनिक” कंपनी अधिकाऱ्यांसोबत कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आढावा बैठक

रत्नागिरी : खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीमध्ये स्थित असलेल्या लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीबाबत सध्या समाज माध्यमांमधून प्रसारित होत असलेल्या काही पोस्ट्स आणि व्हिडीओ यांच्या पार्श्वभूमीवर, रत्नागिरी पोलीस दलाने या प्रकरणी दखल घेतली असून, कंपनीबद्दल प्राथमिक माहिती घेण्यात आली आहे. तसेच या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने रत्नागिरीतील पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कंपनीच्या वतीने प्लांट हेड दीपक पाटील यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत सध्या सोशल मीडियावर व्यक्त होत असलेल्या चिंता, कायदेशीर कामकाजाची आवश्यकता, वैधानिक परवानग्यांचे पालन आणि जनतेशी पारदर्शक संवादाचे महत्त्व यावर चर्चा करण्यात आली. तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने कंपनीच्या प्रतिनिधींना सर्व लागू कायदे, पर्यावरणीय नियम आणि सक्षम अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
समाज माध्यमांवरील अस्पष्ट माहिती किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा त्या प्रसारित करू नयेत व शासकीय यंत्रणांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.



