मुख्य बातमी

संजीवन गुरुकुलमध्ये कै. गुरुवर्य रामचंद्र पुरुषोत्तम जोग यांचा स्मृतिदिन व माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळ संचलित पटवर्धन हायस्कूल संजीवन गुरुकुलमध्ये संजीवन गुरुकुलचे संस्थापक गुरुवर्य रामचंद्र पुरुषोत्तम जोग यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त स्मृतिदिन कार्यक्रम आणि माजी विद्यार्थी स्नेहमेळावा आयोजित केला होता.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (DIET) अधिव्याख्याता श्रीमती दीपा सावंत, भारत शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीराम भावे यांची उपस्थिती लाभली. यावेळी संस्थेचे पदाधिकारी श्री. हातखंबकर, श्री. घवाळी, श्री. वाघमारे, संजीवन गुरुकुलचे माजी प्रबंधक श्री. जाधव, श्री. करमरकर, पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती घाटविलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी दीपप्रज्वलन आणि जोग सर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गुरुकुलच्या प्रबंधक सौ. नाईक यांनी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प स्वागत केले. प्रास्ताविक करताना सौ. नाईक यांनी (कै.) जोग यांची पंचकोश विकसन संकल्पना आणि त्यामागील त्यांची शैक्षणिक दूरदृष्टी कशी होती हे सांगून सरांप्रती आदरभाव व्यक्त केला.

या कार्यक्रमादरम्यान (कै.) जोग यांच्या स्मृतिदिनानिमित्त घेण्यात आलेल्या ‘प्रश्नमंजुषा’ स्पर्धेच्या अनुक्रमे प्रथम तीन विजेते फाटक हायस्कूल, जीजीपीएस आणि फणसोप हायस्कूल यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील ‘आदर्श विद्यार्थी’ आणि ‘होतकरू विद्यार्थी’ यांना गौरविण्यात आले.

गुरुकुलमधील सर्व शिक्षक आणि मदतनीस यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला आणि गुरुकुलमधील आदर्श शिक्षक म्हणून दिनेश मोहिते आणि श्रीमती प्रज्ञा पवार यांना शशिकांत सरपोतदार स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यासाठी आलेल्या डॉ. कोमल भावे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात जोग सर यांच्या आठवणी व गुरुकुलमधील त्यांचे शालेय अनुभव कथन केले. या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी शाळेला रोख रक्कम आणि प्रोजेक्टर स्क्रीन स्नेहभेट म्हणून दिली आणि गुरुकुलसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची आनंदाने तयारी दर्शविली. खास वेळ काढून उपस्थित असलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांची या निमित्ताने स्नेहभेट झाली. गत आठवणींना उजाळा मिळाला. विद्यार्थी मनोमन खुश झाले. याप्रसंगी श्री .जाधव, श्री हातखंबकर यांनी आपल्या मनोगतातून जोग यांना आदरांजली वाहिली.

कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी दीपा सावंत यांनी आपले मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. तसेच गुरुकुल पालक म्हणून त्यांचा अनुभव आणि जोग सरांची शिकवण यामुळे मुले आज कशी संपन्न जीवन व्यतीत करत आहेत हे सांगितले. श्रीराम भावे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून बोलताना जोग सरांचे शैक्षणिक कार्य स्पष्ट केले. यानंतर गुरुकुलमधील विद्या घडशी यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

मुख्य कार्यक्रमानंतर उपस्थित माजी विद्यार्थ्यांमधून माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यात आला. या संघांच्या अध्यक्षा म्हणून श्रीनिधी सावंत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गुरुकुलमधील सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली. भारत शिक्षण मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम उत्तम झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!