रत्नागिरी जिल्हा परिषद सभापतीपदांसाठी नावांची घोषणा

रत्नागिरी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा परिषदेच्या रिक्त असलेल्या सभापती पदांसाठी आगामी सव्वा वर्षाच्या कार्यकाळासाठी पाचजणांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये अनुभवी आणि नवीन चेहऱ्यांचा समतोल साधण्यात आला आहे.
पालकमंत्र्यांनी जाहीर केलेल्या नावांमध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास चाळके यांच्याकडे बांधकाम व आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग सभापती म्हणून सौ. मयुरी मिलिंद शिर्के, महेश राघू नाटेकर हे कृषी, पशुसंवर्धन व औद्योगिक विभाग, ॲड. सुयोग नंदकुमार कांबळे यांच्याकडे समाजकल्याण विभाग, तर नंदकुमार नारायण मुरकर यांच्याकडे अर्थ व शिक्षण विभागाच्या सभापतीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या सर्व नियुक्त्या या सव्वा वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात आल्या असल्याचे पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. आज होणाऱ्या अधिकृत प्रक्रियेपूर्वीच ही नावे जाहीर झाल्याने इच्छुकांच्या हालचालींना पूर्णविराम मिळाला आहे.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर आता जिल्ह्याचा शैक्षणिक, आरोग्यदायी आणि सामाजिक विकास साधण्याची मोठी जबाबदारी असणार आहे.

