मुख्य बातमी

रत्नागिरीत रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त रॅली 

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे आयोजन

रत्नागिरी : रस्ते अपघातांचे प्रमाण कमी व्हावे आणि नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने रत्नागिरी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने आज (७ जानेवारी) शहरात भव्य रस्ता सुरक्षा रॅलीचे आयोजन केले होते.

या रॅलीचा प्रारंभ आरटीओ कार्यालयापासून झाला. या रॅलीने नाचणे, मारुती मंदिर, जयस्तंभ आणि मिरकरवाडा जेटी असा प्रवास करून पुन्हा याच मार्गाने आरटीओ कार्यालयापर्यंत मार्गक्रमण केले. “वाहतूक नियम पाळा सुरक्षित रहा”, “हेल्मेट वापरा, जीव वाचवा” आणि “दारू पिऊन वाहन चालवू नका” अशा घोषणा देत सहभागी नागरिकांनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. रॅलीदरम्यान नागरिकांना सीट बेल्ट, हेल्मेटचा वापर आणि वेगमर्यादा पाळण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. विशेष म्हणजे, या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ नागरिकांना हेल्मेटचे वाटपही करण्यात आले.

या रॅलीत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, सहाय्यक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर, शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील, मोटार वाहन निरीक्षक प्रशांत जाधव, ऋषिकेश कराने, गजानन कुळी, केतन पाटील, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक आनंद शिंदे, अवधूत कुंभार, अक्षय पाटील आणि दिनेश शर्मा यांच्यासह आरटीओ व पोलीस विभागाचे कर्मचारी, नागरिक आणि मोटार सायकल डीलर्सचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!