मुख्य बातमी

मांडकी येथे होणार राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलन

१४ व १५ फेब्रुवारी रोजी आयोजन : शरद पवारांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती

रत्नागिरी : कृषी, सहकार क्षेत्रातील नामवंत लेखकांनी निर्माण केलेले साहित्य जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचावे, लेखक व साहित्याची ओळख सामान्यातील सामान्य माणसाला व्हावी याहेतूने डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण संस्थेने १४ व १५ फेब्रुवारी रोजी ग्रामीण, कृषी व सहकार साहित्य संमेलन भरवण्याचे योजिले असून, एका वेगळ्या विषयाला वाहून घेतलेले हे राज्यस्तरीय संमेलन असणार आहे, अशी माहिती ग्रामीण कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलन समितीचे उपाध्यक्ष अरुण इंगवले यांनी दिली.

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी यावेळी संमेलन संयोजन समितीचे अध्यक्ष प्रकाश देशपांडे, उपाध्यक्ष बाबाजी जाधव, ॲड. दीपक पटवर्धन, जयवंत जळगावकर, गजानन उर्फ आबा पाटील, संदीप राजपुरे, नेहा माने आदी पदाधिकारी उपस्थित होते.

साहित्य संमेलनाविषयी अधिक माहिती देताना देशपांडे म्हणाले, “मांडकी पालवण (ता. चिपळूण) येथे होणाऱ्या या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक, कृषीभूषण तानाजीराव चोरगे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. या संमेलनाचे प्रमुख कार्यवाह म्हणून डॉ. निखिल चोरगे काम पाहणार आहेत.”

“ग्रामीण, कृषी व सहकार साहित्य संमेलन ही प्रथमच नवीन संकल्पना आहे. अनेक ग्रामीण, कृषी व सहकार या विषयाचे नामवंत लेखक या संमेलनात भाग घेणार आहेत. तसेच महाराष्ट्रातून हजारो शेतकरी येणार आहेत. ग्रामीण साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र राज्याबाहेरील साहित्यप्रेमी येणार आहेत. पुस्तक प्रदर्शन आदी सर्व गोष्टींनी परिपूर्ण असे हे संमेलन असणार आहे,” असे ते म्हणाले.

या संमेलनाच्या उ‌द्घाटनासाठी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरदचंद्र पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत तसेच समारोपला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

अखिल भारतीय मराठी साहित्य व संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी व ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांच्यासह या संमेलनाला महाराष्ट्रातून साहित्यिक, प्रगतशील शेतकरी, सहकारातील कार्यकर्ते, कृषी तज्ञ आदी हजर असणार आहेत.

या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचा प्रयोग मांडण्याचा प्रयत्न केला जाणार असून कोकणातील ग्रामीण भागातील जीवन राज्यभरातून येथे येणाऱ्यांना दाखविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचप्रमाणे कोकणात आत्महत्या होत नाहीत कारण इथला शेतकरी परिस्थितीशी झगडून त्यावर मात करत यशस्वी होत असतो, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी कोकणात सहकारातील तज्ज्ञ, यशस्वी शेतकरी यांचा यानिमित्ताने सत्कारही केला जाणार असल्याचे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. कोकणातील खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी संमेलनाच्या ठिकाणी बचत गटांचे खाद्यांचे स्टॉल्स तसेच पुस्तक प्रदर्शन विक्रीसाठी मोफत स्टॉल्स उभारण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!