मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

जानवळे गावात जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी २३ लाख रुपये मंजूर

निविदा प्रक्रियेनंतर रस्त्याची दुरुस्ती होणार, अधिकाऱ्यांची ग्वाही : मनसेच्या विनोद जानवळकर यांच्या निवेदनानंतर सा.बां. उपविभाग गुहागरची तात्काळ दखल

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी–जानवळे फाटा मार्गे गावात जाणारा रस्ता अत्यंत निकृष्ट अवस्थेत असून त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. या रस्त्यामुळे नागरिक व वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वार आणि पादचारी यांच्यासाठी हा रस्ता अक्षरशः जीवघेणा ठरत आहे. काही दिवसांपूर्वी या रस्त्यावर एसटी बस उलटण्याची घटना घडली होती. सुदैवाने मोठा अपघात टळला, मात्र भविष्यात गंभीर दुर्घटना होऊ शकते, असा इशारा देत या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष विनोद गणेश जानवळकर यांनी केली होती.

या संदर्भात सार्वजनिक बांधकाम उपविभाग, गुहागर यांना लेखी निवेदन सादर करून तातडीने दुरुस्तीचे आदेश देण्याची मागणी केली होती. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विभाग कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला होता.

मनसेच्या या ठाम भूमिकेनंतर सार्वजनिक बांधकाम उपविभाग, गुहागर यांनी तात्काळ दखल घेत गुरुवारी उपअभियंता स्वप्नील पाटील व शाखा अभियंता रेणुका ओतारी यांनी स्वतः प्रत्यक्ष येऊन रस्त्याची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी सांगितले की, “सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील वार्षिक देखभाल दुरुस्ती कार्यक्रम अंतर्गत या रस्त्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून, प्रस्तावास तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. सध्या हा प्रस्ताव तांत्रिक मान्यता आणि निविदा प्रक्रियेच्या टप्प्यात असून संबंधित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुरुस्तीचे काम तात्काळ हाती घेण्यात येईल.”

रस्ता दुरुस्तीच्या या प्रस्तावात जानवळे-भडकंब-तळवली-मुंढर (११४) मार्गाच्या दुरुस्तीसाठी २३ लाखांचा निधी मंजूर झाल्याचे उपअभियंता यांनी ग्रामस्थ, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मनसेचे पदाधिकारी यांना सांगितले. तसेच, पुढील एक महिन्याच्या आत काम सुरू होईल, अशी खात्रीही यावेळी अधिकाऱ्यांनी दिली.

 

मनसेचे उपजिल्हा अध्यक्ष विनोद गणेश जानवळकर यांनी ग्रामस्थ व अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर सार्वजनिक बांधकाम उपविभाग, गुहागर तसेच वरिष्ठ अधिकारी यांचे जानवळे ग्रामस्थ आणि मनसे पदाधिकारी यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्यासह गाव अध्यक्ष कमलाकर वणगे, तंटामुक्त समिती अध्यक्ष रमेश नर्बेकर, जानवळे मनसे शाखा अध्यक्ष सुशांत कोळंबेकर, उपशाखा अध्यक्ष प्रवीण लांजेकर, गट अध्यक्ष राहुल रहाटे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र इंदुलकर, सांस्कृतिक विभाग अध्यक्ष राहुल जाधव, विजय शिंदे, अंजली जांभळे, प्रीती जांभळे, चंद्रकला बैकर, दत्ताराम जांभळे, सुखदा तीवरेकर, तसेच गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!