मुख्य बातमी

अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध केल्यास राणे स्टाईलने विरोध थांबवला जाईल : खासदार नारायण राणे 

रत्नागिरी : “राज्य शासनाच्या माध्यमातून सध्या राजापूर तालुक्यातील धोपेश्वर बारसू परिसरामध्ये अणुऊर्जा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यासाठीचा सामंजस्य करार देखील सरकारने केला आहे. त्यामुळे अणुऊर्जा प्रकल्प झाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. राज्याला मोठ्या प्रमाणावर वीज मिळाली तर इंडस्ट्रियल सेक्टर मोठ्या प्रमाणावर विकसित होऊ शकते आणि त्यामुळे मोठे रोजगार निर्माण होऊ शकतात. अणूऊर्जा प्रकल्प आला तर जवळपास एक ते दीड लाख नोकऱ्या स्थानिक लोकांना मिळणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला कोणीही विरोध करू नये. या प्रकल्पाला जर कोणी विरोध केला तर त्यांना राणे स्टाईलने त्यांचा विरोध थांबवला जाईल”, असा निर्वाणीचा इशारा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार नारायण राणे यांनी दिला.

खासदार नारायण राणे आज (२५ जून) रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नेत्याला महत्त्वाचे स्थान असल्याचेही नमूद केले.

अणुऊर्जा प्रकल्पाबाबत बोलताना ते म्हणाले, “प्रकल्पाला विरोध करून काही विरोधक आता एजंटगिरी करत आहेत पैसे कमवत आहेत. उद्धव ठाकरे यांनी रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला प्रकल्प रद्द झाला आता काय झालं. विरोधकांनी प्रकल्पांना विरोध करायचा मग तुम्ही प्रकल्प घेऊन या आम्ही त्याचे स्वागत करू. परंतु स्वतः प्रकल्प कुठे घेऊन यायचं नाही रोजगार निर्मिती करायची नाही हे चालणार नाही. आम्ही ते खपवून घेणार नाही.”

महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सध्या एकही विरोधी पक्ष नेता नाही याबद्दल काय वाटते या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नेत्याला महत्त्वाचं स्थान असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “मी सुद्धा विरोधी पक्ष नेता होतो. आता विद्यमान परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्याला विरोधी पक्ष नेता नाही हे लोकशाहीला धोकादायक असून विरोधी पक्ष नेता असला पाहिजे. विरोधी पक्ष नेत्याचा रोल अत्यंत महत्त्वाचा असतो,”

मुंबई-गोवा महामार्गाच्या संदर्भामध्ये जून महिन्यामध्ये हा महामार्ग पूर्ण होणार होता; मात्र अद्याप पूर्ण झालेला नाही. मी दिल्लीला गेल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधून महामार्ग पूर्ण होण्यासाठी व तो लवकरात लवकर सुरळीत चालू होण्यासाठी निश्चितच प्रयत्न करेन, असे आश्वस्थ करतानाच त्यांनी कोल्हापूर ते वैभववाडी असा रेल्वे ट्रॅक होण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचे अंदाजपत्रक देखील झाले आहे केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्याकडे आमचा पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले.

दरम्यान, एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ज्या बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या बांधणीसाठी आम्ही जीवाचे रान केले, त्या शिवसेनेचा असा अस्त बघताना यातना होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना अनुसरून उत्तरे दिली.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद अधटराव, भाजपा रत्नागिरी शहर प्रमुख दादा ढेकणे, राजापूर तालुका कुणबी पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजू भाटलेकर, रवींद्र नागरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!