रत्नागिरीच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये रिक्त जागांसाठी ‘ऑन-द-स्पॉट’ प्रवेश फेरी जाहीर
१२ आणि १४ ऑगस्ट रोजी राबविली जाणार प्रक्रिया : ऑनलाइन फी भरणे अनिवार्य

रत्नागिरी : कॅप (CAP) च्या चौथ्या प्रवेश फेरीअखेर रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठी येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी (डिप्लोमा) अभ्यासक्रमांसाठी ‘ऑन-द-स्पॉट’ (Spot Round) प्रवेश फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. ही प्रवेश प्रक्रिया १२ ऑगस्ट आणि १४ ऑगस्ट रोजी महाविद्यालयात प्रत्यक्ष पार पडेल, अशी माहिती प्रभारी प्राचार्य डॉ. रा. ल. डोईफोडे यांनी दिली. या फेरीसाठी पात्र असलेले सर्व विद्यार्थी उपस्थित राहू शकतात. मात्र, केवळ काउन्सेलिंग फेरीला उपस्थित राहिल्याने प्रवेशाची हमी मिळणार नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रथम वर्ष तसेच थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका या दोन्ही गटांसाठी ही प्रक्रिया एकाच वेळापत्रकानुसार राबवली जाईल. नोंदणीची वेळ सकाळी १२ वाजेपर्यंत असेल. तात्पुरती गुणवत्ता यादी (Provisional Merit List): दुपारी १ वाजता प्रसिद्ध होईल. तक्रारी / हरकती दुपारी १ ते २:३० वाजेपर्यंत नोंदवता येतील. अंतिम गुणवत्ता यादी (Final Merit List) दुपारी ३ वाजता प्रसिद्ध केली जाईल. प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेस दुपारी ३:३० वाजल्यानंतर सुरुवात होईल.
प्रवेशासाठी येताना उमेदवारांनी आपली ‘FC (CAP/Non-CAP) मान्यता पावती’, सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रे आणि त्यांच्या झेरॉक्स प्रती सोबत आणणे अत्यंत अनिवार्य आहे. सर्व मूळ प्रमाणपत्रांची यशस्वी पडताळणी झाल्यानंतर आणि आवश्यक शुल्क भरल्यानंतरच विद्यार्थ्याचा प्रवेश अंतिम मानला जाईल. प्रवेशाचे शुल्क रोखीने न स्वीकारता केवळ ऑनलाइन माध्यमातूनच (Online Payment) स्वीकारले जाईल. ज्या विद्यार्थ्यांना आपला प्रवेश पूर्ण फी परताव्यासह (Full Refund) रद्द करायचा आहे, त्यांच्यासाठी १२ ऑगस्ट ही अंतिम मुदत असणार आहे.
या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील अधिक माहिती, रिक्त जागांचा तपशील आणि अद्ययावत सूचनांसाठी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या www.gpratnagiri.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



