मुख्य बातमीशैक्षणिक

रा. भा. शिर्के प्रशालेत राजर्षी शाहू महाराज जयंती कार्यक्रम

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रा. भा. शिर्के प्रशालेत २६ जून रोजी राजर्षी शाहू महाराज जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सौ. पी. एम. पवार यांनी भूषविले, तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रशालेतील शिक्षक एस. बी. पाटील हे होते.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती देवी आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमापूजनाने झाली. प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सौ. पी. एम. पवार यांनी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते एस. बी. पाटील यांचे गुलाब पुष्प देऊन प्रशालेतर्फे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि प्रमुख वक्त्यांचा परिचय प्रशालेतील स्वराज्य सभा सदस्य व्ही. एस. मुंडेकर यांनी केले.

यानंतर प्रमुख वक्ते श्री. पाटील यांनी विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज यांचा जीवनपट उलगडून सांगितला. यात प्रामुख्याने राजर्षी शाहू महाराज यांनी समाजात बदल करण्याच्या दृष्टीने केलेले विविध प्रयत्न स्पष्ट करतानाच त्यांनी समाज सुधारण्याचे कार्य कसे केले याविषयी सोप्या शब्दात मुलांना माहिती दिली. राजर्षी शाहू महाराज यांनी कला, संस्कृती, क्रीडा, शिक्षण यांना कशाप्रकारे राजश्रय दिला ते स्पष्ट केले. तसेच समाजातील अंधश्रद्धा, कर्मकांड, दैववाद दूर करण्यासाठी केलेले प्रयत्नही सांगितले. समाजातील प्रत्येक घटकाने शिकावे यासाठी केवळ शिक्षणावर भर न देता ते मोफत आणि सक्तीचे करणारा कायदा देखील कसा निर्माण केला हे देखील विद्यार्थ्यांना सांगितले. समाजात वावरताना समता, बंधुता यांची शिकवण तसेच आरक्षणाचे जनक म्हणून देखील कशाप्रकारे त्यांनी कार्य केले याची सविस्तर माहिती दिली. समाजात असलेली जातीय व्यवस्था नष्ट करण्यासाठी लोकांंमध्ये धार्मिक ऐक्य निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न स्पष्ट केले. अत्यंत ओघवत्या शैलीत आणि सोप्या भाषेत गोष्टी रुपात त्यांनी राजर्षी शाहू महाराज यांचा संपूर्ण जीवनक्रम विद्यार्थ्यांसमोर मांडला.

अध्यक्षीय भाषणामध्ये सौ. पवार यांनी रयतेच्या राजाचे वर्णन गोष्टी रूपाने करून सामाजिक न्याय दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर सांगितले.

या कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेचे मुख्याध्यापक के. डी. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेतील दुपार सत्राचा सांस्कृतिक विभाग आणि स्वराज्यसभा विभाग यांनी उत्तमरीत्या केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुपार सत्र सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख सौ. अभ्यंकर यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार प्रशालेतील दुपार सत्राच्या स्वराज्यसभेच्या प्रमुख सौ. कांबळे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी शाळेतील इयत्ता सातवी आणि आठवीचे विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहिले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!