अजित पवारांच्या स्नेहभोजनावर आमदार भास्कर जाधव यांची तुफान फटकेबाजी
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका जिंकण्याचा निर्धार

आबलोली (संदेश कदम) : “बाकीच्या मंत्र्यांचा श्रावण महिना असेल मात्र अजितदादांकडे मांसाहारी जेवण चांगल्या पद्धतीचे असते त्यांनी आणि मी जवळजवळ १५ वर्ष आम्ही एकत्र काम करत होतो. उत्तम मांसाहारी जेवण अजित दादा देतात; पण, त्यांच्या लक्षात नसेल की श्रावण महिना आहे. कारण, पवार हे कधी कुठला वार, कधी कुठली तीथ वगैरे काही पाळत नाहीत. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या बाकीच्या मंत्र्यांचा श्रावण महिना असावा म्हणून ते गेले नसतील,” असे गमतीशीर उत्तर आमदार भास्कर जाधव यांनी दिले.
राष्ट्रवादीची आणि शिवसेनेची धूसफुस आहे ती पुन्हा एकदा दिसून आली. अजितदादा पवारांनी जे स्नेहभोजन ठेवले, त्या स्नेहभोजनाला फक्त एकटेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेले. कुठलाही मंत्री किंवा आमदार गेला नाही किंवा तिकडे फिरकलाही नाही, याकडे तुम्ही कसे बघता असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला असता त्यांनी हे उत्तर दिले. गुहागरच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.
नुकत्याच शिंदे गटाच्या मेळाव्यात ठाकरे गटाच्या जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर, माजी सभापती विलास वाघे, माजी सभापती दत्ताराम निकम, समीर डिंगणकर आणि कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला, याला उत्तर देताना आमदार जाधव यांनी “चार गेले तरी चाळीस कार्यकर्ते निर्माण करण्याची ताकद माझ्यात असल्याचे निक्षून सांगितले. तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक आहे, ती आम्ही जिंकणारच असा स्पष्ट निर्धार त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.


