मुख्य बातमी

कोकणनगर येथे गांजाची विक्री करणारा एकजण ताब्यात

रत्नागिरी : शहरातील कोकणनगर येथे गांजा हा अमली पदार्थ विक्री करणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही धडक कारवाई केली असून, या प्रकरणी जवळपास ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रईस सईद खान (वय ३२, रा. घर नंबर ३९०, मराठी शाळेसमोर, कोकण नगर रत्नागिरी) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अमली पदार्थांना प्रतिबंध व कारवाई करण्याच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे काल (८ डिसेंबर) रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे हद्दीमध्ये गस्त घालत असताना कोकण नगर कब्रस्थानच्या बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत रईस सईद खान हातात कॅरीबॅग घेवून उभा असलेला या पथकाला दिसला. त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला हटकले; मात्र त्याने पोबारा करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी योग्य बळाच्या सहाय्याने जागीच थांबविले आणि दोन पंचांसमक्ष चौकशी करत अंगझडती घेण्यात आली.

या झडतीमध्ये त्याच्या ताब्यातील पिवळ्या रंगाच्या कॅरीबॅगमध्ये २०४ ग्रॅम वजनाचा “गांजा” अंमली पदार्थ असलेल्या १३ पारदर्शक प्लास्टिक पिशव्या, एक डिजिटल वजन काटा व त्याच्या पॅन्टच्या खिशातून २ मोबाइल फोन व ३ हजार ५०० रुपये रोख रक्कम असा एकूण ४९ हजार ७०० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला.

 

रईस खान याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्या विरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात एनडीपी एस ॲक्ट १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) ii (अ), अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक शबनम मुजावर, पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, हवालदार विजय आंबेकर, हवालदार योगेश नार्वेकर, हवालदार दीपराज पाटील यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!