स्वातंत्र्यानंतर ७५ वर्ष देश एकसंघ राहिला केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच : सुनील कांबळे

रत्नागिरी : “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा,” हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मूलमंत्र विद्यार्थ्यांना प्रेरणा देत राहील. त्यांच्या प्रज्ञा, शील आणि करुणा या विचाराने देशाची प्रगती झाली. तसेच स्वातंत्र्यानंतर ७५ वर्ष देशात विविध, जाती, धर्म, भाषा, प्रांत असताना देखील, भारत एकसंघ राहिला. केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेमुळे,” असे मत माहेर संस्थेचे प्रकल्प प्रमुख, अधीक्षक, सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे यांनी मांडले.

नेहरू युवा केंद्र रत्नागिरी, ग्रामजीवन आधार संस्था रत्नागिरी व दी यश फाउंडेशन माने नर्सिंग कॉलेज ऑफ रिसर्च सेंटर रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने नर्सिंग कॉलेज मिरजोळे, रत्नागिरी या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून सुनील कांबळे बोलत होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित प्रमुख पाहुणे, दी यश फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार बाळासाहेब माने यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. बाळासाहेब माने यांचे स्वागत व सत्कार नेहरू युवा केंद्र रत्नागिरीचे प्रमुख मोहित कुमार सर यांनी संविधान प्रस्तावना, सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन केले.
या कार्यक्रमात, माने नर्सिंग कॉलेजच्या मुलांनी भीम गीत सादर केले व चार विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन व कार्यावर मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी बाळासाहेब माने, माहेर संस्थेचे सुनील कांबळे, नेहरू युवा केंद्राचे मोहितकुमार सैनि, कॉलेजचे प्राचार्य केतन आंबुले, ग्रामजीवन आधार संस्थेचे कुंडलिक कांबळे, नर्सिंग कॉलेज सर्व प्राध्यापक व स्टाफ तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांना अल्पपोहाराची व्यवस्था नेहरू युवा केंद्रातर्फे करण्यात आली होती.


