मुख्य बातमी

रत्नागिरीतील व्यापाऱ्याची ३६ लाखांची फसवणूक

रत्नागिरी : कमी वेळात जास्त नफ्याचे आमिष दाखवून रत्नागिरीतील एका व्यावसायिकाला ३६ लाख ६४ हजार रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिरजोळे एमआयडीसी परिसरातील गांधी फॅब्रिकेटर्स या दुकानाच्या मालकाची ‘क्रिप्टो करन्सी’ ट्रेडिंगच्या नावाखाली ही फसवणूक करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची फेसबुकवर सुहानी शर्मा नावाच्या एका महिलेशी ओळख झाली होती. सुहानीने त्यांचा विश्वास संपादन केला आणि तिचा मित्र डॅनियल हा ‘trustincoin’ या वेब ॲप्लिकेशनचा सिनिअर अकाउंट मॅनेजर असल्याचे सांगितले. डॅनियलने फिर्यादींना व्हॉट्सॲपवर एक लिंक पाठवून ते ॲप लॉगिन करण्यास भाग पाडले.

आरोपींनी फिर्यादींना युएसडीटी ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास अल्पावधीत मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवले. २२ जानेवारी २०२६ ते १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत फिर्यादींचा विश्वास जिंकून त्यांना वेळोवेळी पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले. एकूण ३६ लाख ६४ हजार ७४० रुपये गुंतवल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादींच्या लक्षात आले.

याप्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी २ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुहानी शर्मा (रा. कलकत्ता) आणि डॅनियल (पूर्ण पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या दोघांविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३१८ (४), ३१९ (२), ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (सी) व (डी) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अनोळखी व्यक्तींनी सोशल मीडियावर दिलेल्या गुंतवणुकीच्या ऑफरला बळी पडू नका. कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका किंवा अनोळखी ॲप्समध्ये पैसे गुंतवू नका. फसवणूक झाल्यास त्वरित सायबर हेल्पलाईन नंबर १९३० वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!