तायक्वांदो स्पर्धेला रत्नागिरी नगराध्यक्षांच्या शुभेच्छा

रत्नागिरी : १९ व्या जिल्हास्तरीय खुल्या तायक्वांदो स्पर्धेला सुरुवात झाली असून या स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंना नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांनी शुभेच्छा दिल्या.
६, ७, ८ फेब्रुवारी रोजी होत असलेल्या या स्पर्धा मारुती मंदिर येथील क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सुमारे ६०० खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले आहेत. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत सौ. सुर्वे यांनी या ठिकाणी भेट दिली. यावेळी नगरसेवक सौरभ मलुष्टे देखील उपस्थित होते. दरम्यान आयोजक रत्नागिरी तायक्वांदो संघाच्यावतीने या दोन्ही मान्यवरांचा सीमा धुळप आणि मयूर धुळप यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांनी यावेळी शहरात तायक्वांदो हा खेळ उत्तम प्रकारे वाढत असून अनेक गुणी खेळाडू निर्माण होत आहेत, असे सांगत आनंद व्यक्त केला. तसेच आम्ही नेहेमी खेळाडूंना आवश्यक ते सहकार्य करू, असे आश्वासन दिले.



