मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस कोकणातील शेतकऱ्यांच्या मोर्चाला पाठिंबा देणार

मुंबई : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने तुटपुंजी मदत जाहीर करून वाऱ्यावर सोडल्याने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी महिनाअखेरीस कोकणातील आंबा व काजू बागायतदार धडक देणार आहे. या मोर्चास सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा देवून सहभागी व्हावे यासाठी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची मुंबईत भेट घेतली.
गेल्या दोन महिन्यांपासून कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी अस्मानी व सुल्तानी संकटाने झालेल्या नुकसानीत हेक्टरी ५ लाख व ३ लाख रुपये नुकसान भरपाई मागणीसाठी रस्त्यावरची लढाई लढत आहे. राज्य सरकारने हेक्टरी २२ हजारांची मदत जाहीर करून बोळवण केली आहे. यामुळे कोकणातील आंबा व काजू बागायतदार शेतकरी हवालदिल झाला आहे.
नुकसानभरपाईबाबत राज्य सरकारने आजअखेर कोणतेही पंचनामे अथवा प्रशासकीय आदेश दिलेले नाहीत. एकीकडे २५ हजार कोटींचा कुंभमेळा ३५ हजार कोटी व ८६ हजार कोटींचा शक्तीपीठ १ लाख कोटींपर्यंत खर्च करण्यास मान्यता दिली जात आहे. मात्र दुसरीकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे जिल्ह्यातील शेतकरी मदतीसाठी टाहो फोडत असताना राज्य सरकार आंबा बागायतदार शेतकऱ्यांची चेष्टा करू लागले आहे. यामुळे एप्रिल महिन्याच्या अखेरीस कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी गिरगांव चौपाटी ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे , काँगेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे या सर्वांनी या मोर्चात सहभागी होवून लढा यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले. यावेळी रत्नागिरीचे माजी आमदार बाळा माने, सुशांत नाईक, गणेश गायकर, किरण टेंभुलकर, अजय तेली यांच्यासह कोकणातील शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.



