तिवंदमाळ येथे झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू

राजापूर : गोव्याकडून मुंबईकडे भरधाव वेगाने चाललेला टाटा कंपनीचा ट्रक तिवंदमाळ येथे उभ्या असलेल्या दुसऱ्या ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची घटना आज (२४ फेब्रुवारी) सकाळी पावणे अकराच्या दरम्यान घडली. यात महम्मद रिझवान अब्दुल करीम (वय २८, रा. मंगलोर, दक्षिण कन्नड, कर्नाटक) याचा जागीच मृत्यू झाला आहे.
आपल्या ताब्यातील भारत बेन्झ कंपनीचा ट्रक (केए २० एए ३११९) घेऊन महम्मद हा गोव्याकडून मुंबईच्या दिशेने चालला होता. सकाळी पावणे अकराच्या दरम्यान ओणी, तिवंदमाळ येथे भरधाव वेगाने तो ट्रक आला असता त्यावेळी तेथे असलेल्या राजस्थानी धाब्यावर (आरजे २७ जीडी ०५३१) या उभ्या असलेल्या ट्रकवर जोरात आदळला.
या अपघातात भरधाव वेगाने आलेल्या ट्रक चालकाला जबरदस्त मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर राजापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या मयत ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात धाब्यावर उभ्या असलेल्या ट्रक मधील चालक सुदैवाने बचावला. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एम. एम. शेख अधिक तपास करीत आहेत.



