लांजा – राजापूर मार्गावर बिबट्या आढळला मृतावस्थेत

राजापूर : तालुक्यातील ओणी येथील लांजा – राजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर बिबट्या मृत अवस्थेत आढळल्याची माहिती ४ ऑक्टोबर रोजी पहाटे ३.४० वाजण्याच्या सुमारास राजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमित यादव यांनी दूरध्वनीवरून वन विभागाला दिली.
त्याप्रमाणे तात्काळ रत्नागिरीच्या परिक्षेत्र वन अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती देऊन कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पाहणी करण्यात आली. लांजा ते राजापूर जाणाऱ्या महामार्गाच्या उजव्या बाजूला नर जातीचा अंदाजे तीन ते चार वर्ष वयाचा बिबट्या निपचित पडलेला दिसून आला. जवळ जाऊन बिबट्याची पाहणी केली असता अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याच्या तोंडाला व डोक्याला गंभीर इजा झाल्याने मृत झाला असावा असा प्राथमिक अंदाज नोंदविण्यात आला. त्यानंतर राजापूरचे पशुधन विकास अधिकारी वैभव चोपडे यांच्याकडून बिबट्याचे शवविच्छेदन करून घेण्यात आले. या घटनेचा गुन्हा नोंद केला असून कागदपत्र तयार करून पुढील तपास चालू केला.
ही कार्यवाही रत्नागिरी (चिपळूण) विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कार्यवाहीसाठी परिक्षेत्र वन अधिकारी (रत्नागिरी) प्रकाश सुतार, वनपाल (राजापूर) जयराम बावधने, वनरक्षक (राजापूर) विक्रम कुंभार यांनी कार्यवाही पूर्ण केली. अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणी सापडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय वन अधिकारी रत्नागिरी गिरीजा देसाई यांनी केले आहे.



