१२ व्या युथ गेम्स स्पर्धेसाठी डेरवण सज्ज
१९ खेळांचा समावेश : जेष्ठ क्रीडा संघटक चंद्रजीत जाधव यांच्या हस्ते उद्घाटन

चिपळूण : डेरवण युथ गेम्स २७ फेब्रुवारीपासून श्री विठ्ठलराव जोशी चॅरीटीज ट्रस्टच्या क्रिडासंकुलात पार पडणार आहेत. शिवजयंतीनिमित्त होणाऱ्या बाराव्या डेरवण युथ गेम्सचे उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सेक्रेटरी आणि ज्येष्ठ क्रीडा संघटक चंद्रजीत जाधव यांच्या हस्ते पार पडणार आहे.
२७ फेब्रुवारी ते ६ मार्च या कालावधीत या स्पर्धा पार पडणार असून, या स्पर्धेमध्ये ॲथलेटिक्स, जिम्नॅस्टिक, बॅडमिंटन, टेबल टेनिस, जलतरण, तिरंदाजी, नेमबाजी, बुद्धिबळ, कॅरम, देशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कबड्डी, खो खो, लंगडी, मल्लखांब, योगा या वैयक्तिक खेळासह फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, या खेळांचा समावेश आहे. त्याचबरोबर ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यात आलेला वॉल क्लाइम्बिंग या साहसी खेळाबरोबरच यावर्षी नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या स्केटिंग खेळाचाही समावेश करण्यात आलेला आहे.
भारतीय खेळ आणि ऑलिम्पिक खेळांचा संगम असणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील सात हजारापेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. यंदाही विजेत्यांना पदके, चषक आणि रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. १२०० पदके, ११५ करंडक स्पर्धेत खेळाडूंना बक्षीस रूपाने देण्यात येणार आहे. अनेक राष्ट्रीय खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेण्याचे निश्चित केले आहे. विविध क्रीडा प्रकारात राज्यातील खेळाडूंचा चित्तथरारक खेळ या स्पर्धेनिमित्त पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे.
या स्पर्धेत ८ वर्षांखालील ते १८ वर्षांखालील खेळाडू सहभागी होणार आहेत, अशी माहिती क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर यांनी दिली.


