मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

राजापुरात शिवस्मृती मंडळातर्फे तिथीनुसार भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन

राजापूर : शहरातील शिवस्मृती मंडळाच्या वतीने फाल्गुन कृष्णपक्ष तृतीया, शुक्रवारी (६ मार्च) तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने तीन दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सर्व शिवभक्तांनी बहुसंख्येने उपस्थित राहून उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

उत्सवाची सुरुवात ४ मार्च रोजी सायंकाळी ७ ते १० या वेळेत “गाथा शिवरायांची” या विशेष कार्यक्रमाने होणार आहे. या अंतर्गत स्थानिक कलाकारांकडून शिवचरित्रावरील सादरीकरण केले जाणार आहे. ऐतिहासिक वेशभूषा, शिवविचारांवरील नाट्यरूप मांडणी, पोवाडे, नृत्यकला आणि वीररसाने ओतप्रोत कार्यक्रमांद्वारे शिवकालीन इतिहास जिवंत केला जाणार आहे. तरुण पिढीसमोर छत्रपतींचा आदर्श प्रभावीपणे उभा करण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे.

५ मार्च रोजी दुपारी ४ वाजता भव्य वाहन फेरीचे आयोजन केले आहे. एसटी डेपो परिसर, पेट्रोल पंप मेन रोड येथून प्रारंभ होणारी ही फेरी छत्रपती संभाजी महाराज पेठ, वरची पेठ, राजीव गांधी स्टेडियम, बंदर धक्का, छत्रपती शिवाजी महाराज पथ, कै. वैशंपायन गुरुजी पूल, गुजराळी, चापडेवाडी, ओगलेवाडी, दिवटेवाडी, साखळकरवाडी, खडपेवाडी मोठा पूल मार्गे शिवतीर्थ येथे समारोपास येणार आहे. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघणाऱ्या या फेरीत शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे.

त्याच दिवशी रात्री ८ वाजता शिवचरित्रावरील कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. राष्ट्रीय कीर्तनकार हभप संदीप मांडके बुवा (पुणे) यांचे प्रेरणादायी कीर्तन होणार असून शिवचरित्रातील आदर्श, पराक्रम आणि राष्ट्रभक्तीचा संदेश भाविकांना मिळणार आहे.

६ मार्च रोजी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची पाद्यपूजा, अभिषेक व पुष्पहार अर्पण करून धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात होईल. सायंकाळी ३.३० वाजता शिवकालीन चित्ररथ, देखावे आणि “छत्रपती शिवरायांचा संवाद” यांसह भव्य पालखी सोहळा निघणार आहे. छत्रपतींची पालखी, ढोल पथक, लेझीम पथक, ध्वज पथक, झांज पथक आदींच्या गजरात मिरवणूक शिवस्मारक-शिवतीर्थ, बाजारपेठ, विठ्ठल मंदिर, वीर सावरकर चौक, श्री गणेश घाट मार्गे पुन्हा शिवस्मारक येथे येऊन समारोप होईल.

या भव्य उत्सवासाठी हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान राजापूर यांचे सौजन्य लाभले आहे. शिवस्मारक, शिवतीर्थ, राजापूर येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवभक्तांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!