
रत्नागिरी : नजीकच्या मिरजोळे गावाचे ग्रामदैवत श्री कालिका देवीचा पौर्णिमेचा शिमगोत्सव मंगळवारी अत्यंत उत्साही आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. पहाटेपासूनच संपूर्ण गावात चैतन्याचे वातावरण होते.
उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे पहाटे ढोल-ताशांच्या कडकडाटात आणि देवीच्या जयघोषात ‘मानाची होळी’ वाजत-गाजत सहाणेवर आणण्यात आली. यावेळी गावकऱ्यांनी दाखवलेले अभूतपूर्व शक्ती प्रदर्शन आणि दाटलेला उत्साह उपस्थितांचे डोळे दिपवणारा होता. ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलेली देवीची पालखी आणि तिचा डौलदार नाच पाहून भाविक मंत्रमुग्ध झाले. सुरमाडची प्रचंड मोठी होळी उभारल्यानंतर, शेवरीच्या होळीला होम करण्यात आला. पालखीच्या प्रदक्षिणा पूर्ण होऊन देवी मांडावर विराजमान झाली.सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. भक्ती, परंपरा आणि अंगात संचारलेला उत्साह अशा त्रिवेणी संगमात संपूर्ण मिरजोळे गाव न्हाऊन निघाले होते.



