Uncategorized

वडाला फेऱ्या मारणारी नको, वडाचे रोपण करणारी ती हवी : जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते

समाजकल्याण कार्यालयात जागतिक महिला दिन साजरा 

रत्नागिरी : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेला कार्याचा वसा आणि वारसा रस्त्यावरील दगड फोडणाऱ्या, ऊस भरून बैलगाडी हाकणाऱ्या महिलेपर्यंत पोहचवणं हे जास्त महत्त्वाचे आहे. आजही शिकलेली आमची सावित्रीची लेक व्रत वैकल्यांमध्ये अडकलेली दिसतेय. वडाला फेऱ्या मारणारी नको..वडाचे रोपण करणारी ती हवी.. तिने आता बदलायलाच हवे.. सुरुवात करायलाच हवी. नव्या पिढीची, नव्या धैर्याची सावित्री बनायलाच हवी”, असे मार्गदर्शन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले.

सहायक आयुक्त जिल्हा समाजकल्याण कार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमात ती बोलत होती. कार्यक्रमाला सहायक आयुक्त दीपक घाटे, सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक स्मिता सुतार, इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक उदयसिंह गायकवाड, इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी अपूर्वा कारंडे उपस्थित होते.

श्री. सातपुते म्हणाले, अर्ध जग महिलांचं असतं, असं म्हणतात. तर उर्वरित अर्ध जग महिलांपासूनचं असतं. ‘ती’ असते सुरूवात आणि ‘तीच’ असते सर्व काही. तिच्या पलीकडे काही नाही. तिला सन्मान द्यायला पाहिजे, या मागणीपेक्षा तिला सन्मान मिळत आहे, ही सन्मानपूर्ती ऐकायला यायला हवी.

“पुलं”ना एकदा विचारण्यात आलं होतं. तुमचा पुनःजन्मावर विश्वास आहे का ? असेल तर पुढच्या जन्मी तुम्हाला काय व्हायला आवडेल? विनोदी मनाच्या “पुलं”नी इथे मात्र गंभिरतेने उत्तर देत, मला सुनीता व्हायला अर्थात माझ्या पत्नीचा जन्म पुढच्या जन्मी अनुभवायला आवडेल असं सांगितलं होतं आणि सुनीता देशपांडेंनी “पुलं” होणं, अशी इच्छा व्यक्त केली होती.

मी कवितेला जन्म दिला म्हणजे मी तिचा बाप झालो आणि कवितेने मला “कवी” म्हणून जन्माला घातलं, म्हणून ती माझी “आई” झाली. असं साधं-सरळ जीवनाचं तत्वज्ञान कवी जगदीश खेबुडकर यांनी मांडलेलं होतं. या दोन्ही उदाहरणांचा मी मुद्दाम उल्लेख करतोय, ते “बाईपासून आईपर्यंत” प्रवास झालेल्या स्त्री ची महती अधोरेखित करण्यासाठीच ! “बा” या अक्षराचा अर्थही गुजरातीमध्ये आई असाच होतो. जरी आई होता नाही आलं, तरी आईचा जन्म घ्यायला मला आवडेल. एवढं नक्की! असे सांगून त्यांनी स्त्री जन्माची व्यथा मांडणारी त्यांची कविता सांगितली.

पोलीस निरीक्षक श्रीमती सुतार म्हणाल्या, प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. परंतु, वापरकर्ता स्मार्ट झाला आहे का हा प्रश्नच आहे. शॉपिंग साईटवरून खरेदी करण्यासाठी लागणारे बँक खाते आणि ई मेल हा स्वतंत्र असावा. आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात बँक खाते फ्रीज होते. हे पगार खाते वा व्यवसाय उद्योगाचे खाते असेल तर मोठा त्रास होतो. बदनामी करण्यासाठी आपल्या व्हिडीओचा आणि छायाचित्राचा वापर हॅकर्स एआयच्या मदतीने करतात. त्यामुळे सोशल साईटवर आपले फोटो व्हिडीओ अपलोड करणे टाळावे. लोन ॲप देखील फसवे असतात. कोणतेही नवे ॲप घेत असताना त्याविषयी फायदे तोटे पाहिले पाहिजेत. नवे ॲप कशाची परवानगी मागते याचा अभ्यासही करावा. फोटोचे ॲप असेल तर त्याला माईकची परवानगी कशाला.

सेक्सटॉर्शनच्या अनेक केसेस दाखल होत आहेत. अनोळखी आलेला व्हिडीओ कॉल एक तर घेवू नये. तो कोणाचा आहे हे जाणून घ्यायचे असेल तर कॅमेरा बंद करून तो घ्यावा. समोरची व्यक्ती ओळखीची असेल तर संभाषण पुढे सुरू ठेवावे अन्यथा तो बंद करावा. फोन सुरू असताना समोरच्या व्यक्तीने कोणतेही ॲप ओपन करून माहिती देवू नये. यामुळे आपल्या फोनचा वापर तो मिळवू शकतो. हॅक करू शकतो. काळजी घ्या. सतर्क रहा आणि इतरानांही सतर्क करा असा संदेश शेवटी त्यांनी दिली.

यावेळी सहायक आयुक्त श्री. घाटे, श्रीमती कारंडे, श्री. गायकवाड यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. नवनियुक्त गृहपाल कौमुदी खेडेकर, कनिष्ठ सहायक श्रुती मिणचे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक विजया मोरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामतादूत आशिष कांबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!