वेदांत पावसकरचे यश प्रेरणादायी : नगरसेविका मेधा कुलकर्णी

रत्नागिरी : लहान वयात एखाद्या खेळाचा ध्यास घेऊन त्यात चमकदार कामगिरी करत उत्तम यश मिळवणे नक्कीच कठीण असते. या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेल्या वेदांत विनायक पावसकर याचे यश इतर लहान मुलांना निश्चित प्रेरणादायी असल्याचे उद्गार नगरसेविका सौ. मेधा कुलकर्णी यांनी काढले.
जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून रत्नागिरीचा नावलौकिक वाढवणाऱ्या वेदांत पावसकर याचा वॉर्ड क्रमांक ६ च्या नगरसेविका सौ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लहान वयात क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे ही समाजाची जबाबदारी असून, अशा गुणवंत बालखेळाडूंना मंच उपलब्ध करून देण्याचे महत्त्व नगरसेविका कुलकर्णी यांनी यावेळी अधोरेखित केले.
शहरातील दामले विद्यालयात इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या वेदांत पावसकरने जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत ७ वर्षे वयोगटात बॅकस्ट्रोक आणि फ्री स्टाईल या दोन्ही प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला. गेल्या तीन महिन्यांपासून वेदांत नामवंत जलतरण प्रशिक्षक विवेक विलणकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करत आहे. प्रशिक्षकांचे तांत्रिक मार्गदर्शन, पालकांचा भक्कम पाठिंबा आणि विद्यार्थ्याची जिद्द यामुळेच हे यश प्राप्त झाले आहे.
वेदांतची या क्रीडा प्रकारातली शिस्त, आत्मविश्वास आणि तांत्रिक कौशल्य पाहता “योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास ग्रामीण भागातील अशा चिमुकल्या खेळाडूंमधूनच उद्याचे राज्य, राष्ट्र, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडतात. लहान वयात क्रीडा क्षेत्रात अशी चमकदार कामगिरी करणारी मुले ही समाजाची खरी संपत्ती आहेत.” असा विश्वास यावेळी मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
बाल वयातच आपल्या मुलांच्या क्रीडा कौशल्याला जोपासणारे वेदिका आणि विनायक पावसकर यांच्यासारखे पालक आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. यानिमित्ताने वेदांतच्या पालकांचे अभिनंदन करत वेदांतला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.



