
रत्नागिरी : नागरिकांच्या महसुली समस्यांचे जलद व प्रभावी निराकरण करण्यासाठी शासनाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान – टप्पा क्र. १’ रत्नागिरी तालुक्यात राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत विविध महसूल मंडळांमध्ये समाधान शिबिरे आयोजित करण्यात येणार असून नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित समस्या थेट अधिकाऱ्यांपुढे मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
या अभियानाचे आयोजन उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसीलदार कार्यालय रत्नागिरी यांच्या वतीने करण्यात आले आहे. अभियानाचा मुख्य उद्देश लोकाभिमुख प्रशासन, महसूल विषयक तक्रारींचे त्वरित निवारण आणि डिजिटल सेवांचा प्रसार हा आहे.
या शिबिरांमध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे, विविध दाखले तात्काळ देणे, एक खिडकी योजनेअंतर्गत तक्रार निवारण तसेच अभिलेख ७/१२ दुरुस्ती संदर्भातील हेल्प डेस्क व मार्गदर्शन यांसारख्या सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
रत्नागिरी तालुक्यातील शिबिरांचे वेळापत्रक आहे : ७ मार्च रोजी पाली, ११ मार्च रोजी खालगाव, १४ मार्च रोजी कोतवडे, १८ मार्च रोजी तरवळ, २५ मार्च रोजी जयगड, १ एप्रिल रोजी पावस, ८ एप्रिल रोजी टेंबे, १० एप्रिल रोजी फणसोप, १७ एप्रिल रोजी मालगुंड, ५ मे रोजी खेडशी आणि ८ मे रोजी रत्नागिरी.
नागरिकांनी आपल्या संबंधित मंडळातील शिबिराच्या दिवशी आवश्यक मूळ कागदपत्रे व त्याच्या छायाप्रतीसह उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी जीवन देसाई व तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी केले आहे.



