फाटक हायस्कूलच्या स्पृहा भावेची डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड

रत्नागिरी : फाटक हायस्कूलची इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी स्पृहा तेजराज भावे हिची ‘डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा २०२५-२०२६’ या अखिल भारतीय स्पर्धा उपक्रमात प्रकल्प अहवाल सादर करण्यासाठीच्या आणि मुलाखतीच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.
बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाने आयोजित केलेल्या ‘डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा २०२५-२०२६’ या अभिमानास्पद उपक्रमात यावर्षी एक लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ही स्पर्धा लेखी, प्रात्यक्षिक, कृती संशोधन अहवाल आणि मुलाखत अशा चार टप्प्यांमध्ये घेतली जाते.
या स्पर्धेमध्ये फाटक हायस्कूलने यावर्षी सुयश मिळविले आहे. फाटक हायस्कूलची इयत्ता सहावी अ मध्ये शिकणारी स्पृहा तेजराज भावे या मुलीने या परीक्षेच्या दोन फेऱ्या उत्तीर्ण करून तिसऱ्या व चौथ्या फेरीसाठी ती निवडली गेली आहे. विशेष म्हणजे रत्नागिरीतून निवड झालेली ही एकमेव विद्यार्थिनी फाटक हायस्कूलची आहे.
या परीक्षेसाठी या स्पर्धेसाठी फाटक हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. कीर, विज्ञान शिक्षिका सौ. श्रावणी जोशी, प्रयोगशाळा सहाय्यक श्री. मुरुडकर, कलाशिक्षक श्री. नीलेश पावसकर यांनी तिला मार्गदर्शन व सहकार्य केले आहे. विशेषकरून कृती संशोधन प्रकल्पासाठी स्पृहाला रत्नागिरी येथील प्रतिथयश संशोधक डॉ. स्वप्नजा मोहिते यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.
या स्पर्धेचे हे ४५ वे वर्ष आहे .यंदाच्या स्पर्धेची थीम पृथ्वी प्रणाली आणि मानवी कृती (हस्तक्षेप) असा दिला आहे.
या विषयावर माणसाच्या हस्तक्षेपामुळे नैसर्गिक संपत्तीमध्ये कसे परिणाम होतात याविषयी एक प्रकल्प कुमारी स्पृहा सध्या तयार करीत आहे. तिसऱ्या फेरीसाठी हा कृती संशोधन प्रकल्प तिला सादर करावयाचा आहे. या प्रकल्पावर तिची एक मुलाखत वडाळा, मुंबई, येथे १५ मार्च रोजी होणार आहे. मुलाखतीचेही दोन टप्पे असतात. एक मुलाखत केलेल्या प्रकल्प विषयावर आधारित असते तर दुसरी सर्वसामान्य मुलाखत असते.
वरील प्रकल्प आणि मुलाखतीसाठी दी न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब परुळेकर, उपाध्यक्ष ॲड. सौ. सुमिता भावे, ॲड. विनय आंबुलकर, कार्याध्यक्षा सौ. दाक्षायणी बोपर्डीकर उपकार्याध्यक्ष शेखर शेट्ये तसेच सर्व कौन्सिल सदस्यांनी आणि शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खूप शुभेच्छा दिल्या आहेत.



