मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

मंडणगड, दापोली व खेड पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतींसाठी शासनाची मंजुरी

ग्रामीण प्रशासन अधिक सक्षम करण्याचा निर्णय : राज्यमंत्री योगेश कदम

मुंबई : “रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण प्रशासन अधिक सक्षम, सुसज्ज आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. नागरिकांना विविध कामांसाठी भटकंती करावी लागू नये आणि सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. संबंधित यंत्रणेला प्रशासकीय इमारतीचे बांधकाम दर्जेदार व निश्चित कालावधीत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत,” असे प्रतिपादन राज्यमंत्री योगेश कदम यांनी केले.

रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समिती स्तरावरील पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या दृष्टीने शासनाने मंडणगड, दापोली आणि खेड येथील प्रशासकीय इमारतींच्या बांधकाम व विस्तारीकरणासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.

मंडणगड येथे नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी ९ कोटी ४६ लाख रुपये, दापोली येथे नवीन प्रशासकीय इमारतीसाठी ९ कोटी ४२ लाख रुपये, तर खेड पंचायत समितीच्या इमारतीच्या विस्तारीकरणासाठी १० कोटी ५२ लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

ही तिन्ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तांत्रिक मानकांनुसार पूर्ण करण्यात येणार असून पूर्ण झाल्यानंतर पंचायत समिती अंतर्गत सर्व विभाग एकाच ठिकाणी कार्यरत होणार आहेत. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवा अधिक सुलभ, जलद व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध होणार आहेत. एकूण सुमारे २९ कोटी ४० लाख रुपयांहून अधिक निधी या कामांसाठी मंजूर करण्यात आला आहे.

नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांना आता हक्काची नवीन इमारत मिळणार असल्याने सर्व पंचायत समिती सदस्यांनी व स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत राज्यमंत्री कदम यांचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!