कोकणमहाराष्ट्रमुख्य बातमी

सिंधुदुर्गच्या प्राचीन वारशाच्या जतनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करू : जिल्हाधिकारी

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्राचीन वारसा अतिशय समृद्ध आहे. अश्मयुगीन कातळशिल्पांपासून ते प्राचीन मंदिरे, लोककला असा हा वारसा जपण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करू, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.

निवृत्त माहिती उपसंचालक आणि ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत आणि उपाध्यक्ष, लेखिका डॉ. सई लळीत यांनी श्रीमती धोडमिसे यांची सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी त्यांनी ही भावना व्यक्त केली. यावेळी जिल्ह्याच्या वारशासंदर्भातील विविध प्रश्नांवर चर्चा झाली. गेली २५ वर्षे सातत्याने कातळशिल्पांचा अभ्यास करणारे श्री. लळीत यांनी आपले ‘सिंधुदुर्गातील कातळशिल्पे’ हे संशोधनपर पुस्तक जिल्हाधिकारी यांना दिले आणि जिल्ह्याच्या या अश्मयुगीन प्रागैतिहासिक वारशाबाबत माहिती दिली. तसेच, ‘युनेस्को’ने जागतिक वारसा स्थळांच्या प्राथमिक यादीत स्थान दिलेल्या कुडोपी कातळशिल्प ठिकाणाला भेट देण्याची विनंती केली. तसेच, चिरेखाणी, रस्ते यामुळे कातळशिल्पांसमोर उभ्या राहिलेल्या धोक्यांची माहिती दिली.

यावर श्रीमती धोडमिसे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन आपण लवकरच कातळशिल्पांची पाहणी करु, असे सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातळशिल्पांच्या प्रागैतिहासिक ठेव्याबाबत मी माहिती घेत आहे. हा प्राचीन मानवी वारसा आपल्या जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे. त्याचे जतन, संरक्षण, प्रसिद्धी याबाबत आपण शक्य ते सर्व प्रयत्न नक्की करु, असे त्या म्हणाल्या. याचबरोबर येथील कोकणी वास्तुशैलीची वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे, विविध लोककला अतिशय समृद्ध आहेत. हा वारसाही मूळ स्वरुपात पुढच्या पिढ्यांसाठी जपला गेला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

डॉ. सई लळीत यांनी त्यांना ‘घुंगुरकाठी’ संस्थेबाबत आणि विविध उपक्रमांबाबत माहिती दिली व आडाळी (दोडामार्ग) येथील ‘घुंगुरकाठी भवन’ला भेट देण्याची विनंती केली. निसर्गरम्य आडाळी परिसर आणि आडाळी एमआयडीसीला भेट देऊन याबाबत ग्रामस्थांच्या समस्या जाणून घ्याव्यात, अशा आशयाचे निवेदनही त्यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!