आर्ट सर्कलच्या वतीने गझल गायन स्पर्धेचे आयोजन
सुप्रसिद्ध गझल गायक दत्तप्रसाद रानडे करणार परीक्षण

रत्नागिरी : येथील आर्ट सर्कलतर्फे कै. नलिनी प्रताप कानविंदे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गझल गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १८ ते ४० वर्षे वयोगटातील स्पर्धकांसाठी खुली असून मराठी, हिंदी किंवा उर्दू भाषेतील गझल स्वीकारली जाणार आहे.
स्पर्धकांनी आपली गझल ध्वनिमुद्रित करून नाव, वय व राहण्याचे ठिकाण नमूद करत २ एप्रिलपर्यंत व्हॉट्सअॅप क्रमांक 8669 082727 वर पाठवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कराओके किंवा लाईव्ह कार्यक्रमातील रेकॉर्डिंग स्वीकारले जाणार नाही. तानपूरा, हार्मोनियम व तबला या वाद्यांच्या साथीनेच ध्वनिमुद्रण अपेक्षित आहे.
प्राथमिक फेरीतून निवडलेल्या १० स्पर्धकांची यादी ९ एप्रिल रोजी जाहीर करण्यात येईल. अंतिम फेरी २६ एप्रिल रोजी रत्नागिरी येथे होणार आहे. या स्पर्धेचे परीक्षण आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गझल गायक दत्तप्रसाद रानडे करणार आहेत. स्पर्धेत प्रथम १० हजार रुपये, द्वितीय ७ हजार रुपये व तृतीय ५ हजार रुपये अशी पारितोषिके तसेच सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आर्ट सर्कलच्या वतीने करण्यात आले आहे.



