क्रीडामहाराष्ट्रमुख्य बातमी

अनधिकृत’ स्पर्धांवर बंदी! सहभागी झाल्यास ‘आजीवन बंदी’

भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचा कडक इशारा

पुणे : राज्यातील खो-खो विश्वात मोठी खळबळ उडवणारा निर्णय घेत महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने ‘अनधिकृत’ स्पर्धांविरोधात थेट कारवाईचा इशारा दिला आहे. ‘खो-खो इंडिया’ किंवा ‘खो-खो महाराष्ट्र’ या नावाखाली आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये सहभागी झाल्यास खेळाडू, प्रशिक्षक आणि पंचांवर आजीवन बंदी घालण्यात येईल, असा स्पष्ट आणि कठोर इशारा देण्यात आला आहे. संघटनेचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी पत्राद्वारे सर्व जिल्हा संघटनांना ही सूचना पाठवली आहे.

भारतीय खो-खो महासंघ (KKFI) ही भारत सरकार, भारतीय ऑलिम्पिक संघटना आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त एकमेव संस्था असून महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ही तिची अधिकृत राज्य संघटना आहे. मात्र, गेल्या काही काळात ‘खो-खो इंडिया’ या नावाखाली समांतर आणि अनधिकृत स्पर्धा आयोजित केल्या जात असून त्यामुळे खेळाडूंची दिशाभूल होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा स्पर्धांमध्ये सहभाग घेतल्यास खेळाडूंच्या अधिकृत कारकिर्दीवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.

स्पष्ट निर्देश; अनधिकृत उपक्रमांपासून पूर्णपणे दूर राहा

नुकत्याच पुणे येथे पार पडलेल्या शासकीय परिषदेत असोसिएशनच्या पदाशिकारी व सदस्यंनी अनधिकृत स्पर्धा, निवड चाचण्या, प्रशिक्षण शिबिरे किंवा पंच परीक्षा यामध्ये कोणत्याही परिस्थितीत सहभागी होऊ नये असे जोरदार मत व्यक्त केले. यापूर्वी अनावधानाने सहभागी झालेल्या खेळाडू व कार्यकर्त्यांनी लेखी माफीनामा व हमीपत्र दिल्यास त्यांच्यावरील जुनी कारवाई मागे घेतली जाईल. मात्र, यासाठी ५ एप्रिल म्हणजे पुढील शासकीय परिषद सभेपूर्वी हे माफीनामा व हमीपत्र देणे बंधनकारक केले आहे असे सरचिटणीस सांगितले. यानंतरही कोणी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

अधिकृतता केवळ ‘भारतीय खो-खो संघा’कडेच

भारतीय क्रीडा क्षेत्रात खो-खो खेळाचे नियमन, प्रशासन आणि अधिकृत स्पर्धांचे आयोजन करण्याचे सर्वाधिकार केवळ भारतीय खो-खो संघ (KKFI) कडेच आहेत. ही संस्था भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाद्वारे मान्यताप्राप्त एकमेव राष्ट्रीय क्रीडा महासंघ (NSF) आहे. इतकेच नव्हे तर, ही संस्था भारतीय ऑलिम्पिक संघटना (IOA), आशियाई खो-खो महासंघ (AKKF) आणि आंतरराष्ट्रीय खो-खो महासंघ (IKKF) शी संलग्न असलेली देशातील एकमेव कायदेशीर संस्था आहे. त्यामुळे या संस्थेच्या मान्यतेशिवाय होणाऱ्या कोणत्याही स्पर्धांना कायदेशीर आधार उरत नाही. त्यासंदर्भात भारतीय खो-खो महासंघाचे सरचिटणीस उपकार सिंग विर्क यांनी २ मार्च २०२६ रोजी अधिकृत पत्रक काढून इशारा दिला आहे.

तळागाळापर्यंत संदेश पोहोचवण्याचे आवाहन

चुकीच्या माहितीमुळे खेळाडूंचे नुकसान होऊ नये, यासाठी जिल्हा संघटनांनी हा संदेश तळागाळातील खेळाडू, क्रीडा मंडळे आणि प्रशिक्षकांपर्यंत पोहोचवावा, अशा सूचना प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी दिल्या आहेत. खो-खो खेळाची प्रतिष्ठा, शिस्त आणि अधिकृत संरचना टिकवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

खेळाडूंनी योग्य मार्ग निवडावा 

“अनेक खेळाडू अनधिकृत संस्थांच्या जाळ्यात अडकून आपली कारकीर्द धोक्यात घालतात. खेळाडूंनी केवळ अधिकृत जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय संघटनांच्या स्पर्धांनाच प्राधान्य द्यावे, जेणेकरून त्यांना सरकारी सवलती आणि भविष्यातील संधींचा लाभ मिळेल,” असे स्पष्ट मत प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!