मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

अर्जुना नदीतील गाळ उपशाच्या कामाला प्रारंभ 

राजापूर : नद्यांमध्ये साचलेल्या गाळामुळे निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी यंदाच्या वर्षीदेखील राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीपात्रातील गाळ उपशाच्या कामाला बुधवारी प्रारंभ करण्यात आला आहे. आमदार किरण सामंत यांच्या पुढाकारातून तसेच, जलसंपदा विभाग रत्नागिरी आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

यावेळी रत्नागिरी जलसंपदा विभागाचे अधिकारी श्री. तिरमिरे, श्री. गुरव तसेच नाम फाउंडेशनचे कोकण समन्वयक समीर जानवलकर, महेंद्र खेडेकर, मशीन ऑपरेटर साहील आदी उपस्थित होते.

कोकणातील नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर साचलेल्या गाळामुळे पाण्याचा प्रवाह अडथळलेला असून त्यामुळे पूरस्थिती आणि पाणीटंचाईसारख्या समस्या निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार सामंत यांच्या प्रयत्नांतून नदीपात्र स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी कोदवली नदीपात्रातील गाळ स्थानिक लोकवर्गणी व नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून उपसण्यात आला होता. मात्र, उपसलेला गाळ वाहून नेण्यासाठी शासनाकडे स्पष्ट धोरण किंवा निधी नसल्याने तोच गाळ पुन्हा पावसाळ्यात नदीपात्रात येऊन साचत असल्याची समस्या निर्माण झाली आहे. याबाबत शासनाने ठोस धोरण आखावे, अशी मागणी कोकणवासीयांकडून होत आहे. तसेच, राजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली नदीपात्रातील गाळ उपशाचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!