मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

विहिरीत पडलेल्या मादी बिबट्याला जीवदान

राजापुरात वन विभागाकडून अवघ्या ४ मिनिटांत थरारक रेस्क्यू

राजापूर : तालुक्यातील जुवाठी शिर्केवाडी येथे एका खासगी विहिरीत पडलेल्या सुमारे दीड ते दोन वर्ष वयोगटातील मादी बिबट्याला वन विभागाने अत्यंत कौशल्याने आणि वेगाने बाहेर काढले. केवळ ४ मिनिटांत राबवलेल्या या रेस्क्यू ऑपरेशनमुळे बिबट्याला सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात यश आले आहे.

आज (१ एप्रिल) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मौजे जुवाठी शिर्केवाडी येथील रामचंद्र नारायण भारती यांच्या मालकीच्या विहिरीत एक वन्यप्राणी पडल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. विहिरीची खोली सुमारे ३५ ते ४० फूट होती. विहिरीत डोकावून पाहिले असता, एक बिबट्या पाण्यातील एका दगडावर आश्रयाला बसलेला दिसून आला. जुवाठीच्या पोलीस पाटलांनी तातडीने या घटनेची माहिती राजापूर परिमंडळ वन अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून दिली.

घटनेचे गांभीर्य ओळखून परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर वनपाल राजापूर, वनरक्षक आणि रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. बिबट्या विहिरीत अडकल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी पिंजरा मागवण्यात आला. सकाळी ११ वाजता सर्व तयारी पूर्ण करून पिंजरा दोरीच्या साह्याने विहिरीत सोडण्यात आला.

वन विभागाच्या टीमने अत्यंत सावधगिरीने पिंजरा विहिरीत उतरवला. पिंजरा पाहताच बिबट्याने त्यात प्रवेश केला आणि अवघ्या ४ मिनिटांत, बिबट्याला सुस्थितीत जेरबंद करण्यात आले. यानंतर राजापूरचे पशुधन विकास अधिकारी डॉ. वेर्लेकर यांनी बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली. तपासणीत बिबट्या मादी जातीचा असून ती पूर्णपणे सुदृढ असल्याचे स्पष्ट झाले.

विभागीय वनअधिकारी (चिपळूण) गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड आणि वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर या मादी बिबट्याला तिच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून देण्यात आले.

या यशस्वी कामगिरीमध्ये वनक्षेत्रपाल श्री. सुतार, वनपाल (राजापूर) जयराम बावदाणे, वनरक्षक विक्रम कुंभार आणि रेस्क्यू टीममधील दीपक चव्हाण, निलेश म्हादये, नितेश गुरव, संदीप जाधव, साहील जांगळी व स्थानिक ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!