मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

जगबुडी पुलावर भीषण अपघात

इथेनॉल टँकर पलटी होऊन केमिकल थेट नदीत

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे नाका परिसरात आज (४ एप्रिल) दुपारी १.३० च्या दरम्यान भीषण अपघात घडला असून इथेनॉल केमिकलने भरलेला टँकर जगबुडी नदीवरील पुलावर पलटी झाला. या दुर्घटनेनंतर टँकरमधील केमिकलची मोठ्या प्रमाणात गळती होऊन ते थेट जगबुडी नदीत मिसळल्याने पर्यावरण आणि पाणीपुरवठ्यावर गंभीर धोका निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून लोटे एमआयडीसीकडे निघालेला हा टँकर पुलावरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. अपघातानंतर इथेनॉल केमिकल मोठ्या प्रमाणात सांडले आणि परिसरात तीव्र उग्र वास पसरला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता खेड शहरासह वेरळ आणि इतर गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जगबुडी नदीवरील जॅकवेल विहिरींवर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून खेड नगरपालिकेने तातडीने पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नदीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवाल समाधानकारक आल्यानंतरच पाणीपुरवठा पुन्हा सुरू केला जाणार आहे.

अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. गळती रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून लोटे एमआयडीसीमधील तज्ज्ञांची मदतही घेण्यात येत आहे.

दरम्यान, नगराध्यक्ष माधवी बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश (पप्पू) चिकणे, नगरसेवक निकेतन पाटणे, यश खेडेकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन धाडवे, माजी नगरसेवक बशीर मुजावर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सणस आणि पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

हा इथेनॉल केमिकल टँकर महाड येथील लक्ष्मी इंडस्ट्रीजमधून बेंगळुरूकडे जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, या अपघातामुळे नदीचे पाणी दूषित होण्याची शक्यता व्यक्त होत असून स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.

दरम्यान, या घटनेमुळे केवळ अपघाताचेच नव्हे तर संभाव्य पर्यावरणीय संकटाचेही गंभीर स्वरूप समोर आले असून पुढील काही तास प्रशासनासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवून त्याचा अहवाल येईपर्यंत नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.

आठ दिवसांतील दुसरी घटना

लोटे वसाहतीमधील लक्ष्मी ऑर्गनिक्स कंपनी वादात सापडली असून कंपनीच्या टँकरचा आठवड्यातील सलग दुसरा अपघातामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भोसते घाटात कंटेनर उलटल्यानंतर तो रातोरात पाठविण्यात आला या घटनेनेनंतर आज पुन्हा याच कंपनीशी संबंधित असलेल्या टँकरचा अपघात झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!