मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

चिरे अंगावर पडून वृद्ध महिलेचा मृत्यू

लांजा येथे घराचे काम सुरू असताना दुर्दैवी घटना

लांजा : घराच्या बांधकामासाठी माळ्यावर ठेवलेले चिरे अंगावर कोसळून एका ६७ वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना लांजा येथे घडली आहे. वनिता वसंत पांचाळ असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत वनिता पांचाळ यांच्या घराचे नूतनीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. ३ एप्रिल रोजी शेजारी धार्मिक कार्यक्रम (पूजा) असल्याने बांधकामाचे काम बंद ठेवण्यात आले होते. दुपारी ३:१५ च्या सुमारास वनिता या घराच्या एका खोलीत विश्रांती घेत होत्या.

त्याच वेळी माळ्यावर चिरे साठवण्यासाठी ठेवलेली लाकडी फळी अचानक तुटली. फळी तुटल्यामुळे त्यावर ठेवलेले जड चिरे थेट खाली झोपलेल्या वनिता यांच्या डोक्यावर कोसळले. या भीषण आघातामुळे त्या गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडल्या.

 

चिरे पडल्याचा मोठा आवाज ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने घराकडे धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या वनिता यांना तातडीने लांजा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!