रत्नसिंधु केसरी २०२६ कुस्ती स्पर्धेचे रत्नागिरीत आयोजन

रत्नागिरी : शहरातील मांडवी समुद्र किनाऱ्यावर येत्या १२ एप्रिल रोजी ‘रत्नसिंधु केसरी २०२६’ या भव्य जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा रंगणार आहे.
या स्पर्धेसाठी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाला निलेश राणे आणि नितेश राणे हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळ, निलेश पर्व, प्रहार डिजिटल, लबॅक ट्रान्सपोर्ट आणि आमदार निलेश राणे मित्र मंडळ यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. रविवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून कुस्तीच्या या थराराला सुरुवात होईल. रत्नागिरीतील कुस्तीप्रेमींनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.


