मुख्य बातमी

आरेच्या समुद्रात वाहून गेलेल्या डोंबिवली येथील पर्यटकाचा मृतदेह सापडला

रत्नागिरी : तालुक्यातील आरे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी डोंबिवलीहून आलेला तरुण समुद्र स्नानाचा आनंद लुटताना वाहून गेला होता. या तरुणाचा अखेर मृतदेह सापडला आहे. निशांत राजेश ठाकरे (वय २४, रा. डोंबिवली, ठाणे) असे या मृत तरुणाचे नाव आहे. रविवारी (१२ एप्रिल) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास काळबादेवी येथील समुद्रकिनाऱ्यावर त्याचा मृतदेह आढळून आला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, निशांत ठाकरे हा त्याचे मित्र अंकितकुमार राकेशकुमार सिंह आणि इतर सहकाऱ्यांसोबत शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास आरे बीचवर पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने निशांत पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला. त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा आणि शोधण्याचा बराच प्रयत्न केला, मात्र तो सापडला नाही. या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती.

पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थ शनिवारपासूनच त्याचा शोध घेत होते. दरम्यान, रविवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास काळबादेवी फडजीवाडी येथील मारुती मंदिराजवळील समुद्रकिनाऱ्यावर एक मृतदेह तरंगताना पोलीस पाटील व पोलिसांना दिसून आला. घटनेची माहिती मिळताच निशांतचे वडील, मित्र आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाहणी केल्यानंतर हा मृतदेह निशांत ठाकरे याचाच असल्याची खात्री केली.

पोलिसांनी मृतदेह रुग्णवाहिकेतून तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात नेला. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!